मंगळवारी गेले दोघांचे बळी. एकाच दिवसात तब्बल 170 पॉझिटिव्ह संपूर्ण गोवा लॉकडाऊन करण्याची मागणी
प्रतिनिधी / पणजी
राज्यात काल मंगळवारी कोरोनाचा कहर झाला असून एकाच दिवसात तब्बल 170 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. आतापर्यंतचे हे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा फैलाव संपूर्ण राज्यभरात झपाटय़ाने होत असल्याने त्याची दहशत आता खूपच वाढली आहे. त्याचबरोबर मंगळवारी दोन रुग्णांचे बळी गेल्याने राज्यातील बळींची संख्या 18 झाली आहे. सुरुवातीपासूनच्या रुग्णांची संख्या 2753 असून त्यातून 1607 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 1128 सक्रिय रुग्ण असून मंगळवारी 67 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण गोवा लॉकडाऊन करणे हिताचे ठरेल, अशी जनतेची भावना बनली आहे.
मंगळवारी राज्यभरातून 2724 जणांचे नमूने घेण्यात आले. त्यातून 2018 जणांचे अहवाल आले ज्यामध्ये 170 जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारपर्यंत सडा येथील रुग्णांची संख्या 91 झाली असून बायणा 112, नवेवाडे 92, तर खारीवाडा 54 रुग्ण झाले आहेत. कुडतरीत 33, चिंबल 73, झुवारीनगर 146, बाळ्ळी 42 तर एकटय़ा टुलिप डायग्नोस्टिक कंपनीतील रुग्णांची संख्या 136 वर पोहोचली आहे.
पेडणेतही आता कोरोनाचा फैलाव
पेडणे तालुक्यातही आता कोरोनाचा फैलाव वाढू लागला असून मंगळवारी पेडणेतील रुग्णसंख्या 13 झाली आहे. नेरुल येथेही रुग्ण वाढत असून तेथे 23 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. लोटली येथे 28, इंदिरानगर चिंबल 34, मडगाव 13, केपे 16, सांखळी 28, फोंडा 41, वाळपई 23, धारबांदोडा 17, तर कुंकळळीत 27 रुग्ण आहेत.
गोवा लॉकडाऊन करण्याच्या मागणीला जोर
राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच आतापर्यंत 18 जण त्यात दगावले आहेत. अजूनही काही जणांची प्रकृती नाजूक आहे. गावागावात व वाडय़ावाडय़ावर कोरोना बाधित सापडू लागल्याने आता संपूर्ण गोवा लॉकडाऊनखाली आणण्यासाठी सरकारवर जनतेमधून प्रचंड दबाव येत आहे. आज होणाऱया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील हा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत सरासरी 100 नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यातल्या त्यात बरे होणाऱयांची संख्या 50 टक्के आहे. कोरोना बाधितांचा आकडा मंडळवारीही वाढला.
झपाटय़ाने होतोय कोरोनाचा फैलाव
आता कोरोना बाधित संपूर्ण गोव्याभर पसरले आहेत. त्याचा फैलाव आता झपाटय़ाने होत आहे. त्यातच अनेकजण मरण पावले. खुद्द वास्कोमध्येच कोरोनाची झळ पोहोचलेल्या भागात आतापर्यंत 12 जणांनी आपले प्राण गमावले तर संपूर्ण गोव्यात कोविडमुळे प्राण गमावणाऱयांची संख्या 18 पर्यंत पोहोचली. अद्याप अनेकजण मडगाव कोविड इस्पितळात आयसीयुमध्ये आहेत व त्यातील काहींची प्रकृती ही नाजूक बनली आहे.
……………………………………………
… तर कोरोनाचा एवढा फैलाव राज्यभरात झाला नसता
कोरोना हा केवळ वास्कोपुरता मर्यादित असताना मुरगाव तालुक्यातील आमदार व राज्यातील बहुतेकांनी वास्को लॉकडाऊन करण्याची जोरदार केलेली मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. परिणामी कोरोना बाधित संपूर्ण गोव्यात परसले व कोरोनाचा फैलाव वाढत गेला आहे. खुद्द आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी देखील कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर वास्को परिसर पूर्णतः लॉकडाऊन खाली आणण्याची मागणी केली होती. त्यावेळीच जर संपूर्ण वास्को लॉकडाऊनखाली आणले असते तर आज कोरोना संपूर्ण गोवाभर फैलावला नसता.
………………………………………..
आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत लॉकडाऊनवर होणार चर्चा
राज्यातील परिस्थिती सरकारच्या नियंत्रणा बाहेर पोहोचली असून नव्याने संपूर्ण गोव्यात लॉकडाऊन करण्यासाठी राज्य सरकारवर जनतेचा दबाव वाढत आहे. तसेच राज्यात किमान आठ दिवस लॉकडाऊन असावा व कोरोना नियंत्रणात येतो का? याची तपासणी करण्याची मागणी जनतेने केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज बुधवारी बोलावली असून या बैठकीतही लॉकडाऊन विषयावर चर्चा होईल, असा अंदाज आहे.
गोव्यात 14 जुलैपर्यंत कोरोनाबाधित 2753
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 1607
उपचार घेणारे सक्रिय रुग्ण 1128
14 जुलै रोजीचे नवे रुग्ण 170
14 जुलै रोजी बरे झालेले रुग्ण 67
आतापर्यंतचे मृत्यू 18
राज्यपालांनी बोलवली आज तातडीची बैठक
कोविड परिस्थितीचा घेणार आढावा
राज्यात कोरोनाचे रुग्ण आणि बळी वाढू लागल्याने राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी चिंता व्यक्त केली असून त्याची गंभीर दखल घेऊन आज बुधवारी दि. 15 जुलै रोजी तातडीची बैठक राजभवनवर बोलवण्यात आली आहे.
या बैठकीत गोव्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा राज्यपाल घेणार असून उपाय सुचवतील असा अंदाज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव परिमल राय व इतर संबंधित प्रमुख्य अधिकाऱयांना या बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे.