ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने 31 मार्च पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच सिनेमा हॉल आणि शॉपिंग मॉलमध्ये देखील येणाऱ्या संख्येवर नियंत्रण घालण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थिएटर मध्ये येणाऱ्यांची क्षमता 50 टक्के असणार आहे. तर मॉलमध्ये एकावेल केवळ 100 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमावलेल्या नागरिकांना स्मरण करत पुढील आठवड्यापासून येणाऱ्या प्रत्येक शनिवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत मौन पाळले जाणार आहे. या कालावधीत रस्त्यावरील वाहनांना देखील हॉर्न वाजवण्यास मनाई केली आहे.
दरम्यान, पंजाबमध्ये गुरुवारी 2,387 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 32 जणांचा मृत्यू झाला. सद्य स्थितीत 14,366 रुग्णांवर उपचार सुरू आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.