प्रतिनिधी / सांगली
सांगली ग्रीन झोन होणार अशी मनिषा बाळगणार्यांना रविवारी सर्वात मोठा तडाखा बसला. दिवसभरात 19 रूग्ण वाढले. कोरोनाशी लढताना दोघांनी प्राण सोडले. तर पाचजण कोरोनामुक्त झाले. लॉकडाऊन ढिला होत असताना कोरोनाचा फास मात्र आवळला जात आहे असे चित्र जिल्हय़ात निर्माण होत चालले आहे. जिल्हय़ात एकूण कोरोना रूग्णांची संख्या 167 झाली आहे.
मणदूर कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट बनला
शिराळा तालुक्यातील मणदूर येथे काही दिवसापुर्वी मुंबईतून आलेल्या आणि सध्या संस्था क्वारंटाईन असणाऱया 13 लोकांचा रविवारी स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे. त्यामध्ये आठ पुरूष आणि पाच महिला आहेत. या सर्वांच्यावर तातडीने मिरजेतील कोरोना रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. मणदूर या गावात यापुर्वीही मोठय़ाप्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मणदूर हे गाव जिल्हय़ातील कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. या संपूर्ण गावात प्रतिबंधित क्षेत्र केले असून याठिकाणी 100 टक्के लॉकडाऊन ठेवले आहे. तरीसुध्दा या गावातून दररोज रूग्ण वाढत चालले आहेत. या रूग्णांचा यापुर्वी एकमेकांशी सातत्याने संपर्क आल्याने कोरोनाचा फैलाव होत असल्याचे समोर आले आहे.
तासगाव तालुक्यातील पेड येथील 35 वर्षीय युवक, तसेच वायफळे येथील 52 वर्षीय व्यक्ती, कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील 38 वर्षीय महिला, खानापूर तालुक्यातील विटा येथील 34 वर्षीय युवक, शिराळा तालुक्यातील सोनवडे येथील 28 वर्षाचा युवक आणि इस्लामपूर येथील कोरेनगर मधील 33 वर्षाची महिला बाधित झाले आहेत.
पाच जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात जरी 19 नवीन कोरोनाचे रूग्ण वाढले असले तरीसुध्दा जिल्हय़ात पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हय़ाला थोडासा दिलासा मिळाला आहे. यामध्ये वाळवा तालुक्यातील चांदोली वसाहत येथील 22 वर्षीय युवक, खानापूर तालुक्यातील करंजे येथील 30 वर्षीय युवक, कडेगाव तालुक्यातील आंबेगाव येथील 12 वर्षाची मुलगी आणि नऊ वर्षाचा मुलगा तर शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 21 वर्षीय युवक यांचा समावेश आहे. या सर्वाना आता संस्था क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
दोघांचा मृत्यू
जिल्हय़ात रविवारी कोरोनाचा उपचार सुरू असणाऱया दोघांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामध्ये जत तालुक्यातील आवंढी येथील 55 वर्षीय व्यक्ती आणि शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 80 वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्हय़ात कोरोनाने बळी जाणाऱयांची संख्या आता सातवर पोहचली आहे. यापुर्वी सांगली-विजयनगर, कडेगाव-भिकवडी, शिराळा-मोहरे, कडेगाव-नेर्ली येथील व्यक्ती आणि आटपाडी-झरे येथील महिला यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सहा जणांची प्रकृती चिंताजनकच
सध्या उपचारात असलेल्या सहा रूग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यामध्ये खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील 60 वर्षीय व्यक्ती, शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 81 वर्षीय आणि खिरवडे येथील 56 वर्षीय व्यक्ती कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील 50 वर्षाची महिला यांच्यावर व्हेंटीलेटरवर उपचार सुरू आहेत. तर नांगोळे (मूळ गाव कडेबिसरी, ता. सांगोला.) येथील 48 वर्षीय व्यक्तीवर ऑक्सिजनवर उपचार सुरू आहेत. तर रविवारी पॉझिटीव्ह आलेला विटा-हनुमंतनगर येथील 34 वर्षीय युवक अत्यवस्थ आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 167
बरे झालेले 92
उपचारात 68
मयत 07