- दिल्लीत आतापर्यंत 109 डॉक्टरांनी गमावला जीव
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात समोर आलेले अनेक आकडे धक्कादायक आहेत. अनेक राज्यात रुग्णांना बेड मिळत नव्हते, त्यातच लसींचा तुटवडा जाणवत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती काही प्रमाणात सुधारता दिसत आहे.
मात्र, त्यातच इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने एक धक्कादायक आकडा जारी करण्यात आला आहे. IMA च्या मते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत कमीत कमी 646 डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. त्यातील 109 डॉक्टर्स हे एकट्या दिल्लीतील आहेत.
आयएमएने राज्यानुसार आकडेवारी जाहीर केली यामध्ये दुसऱ्या लाटेत दिल्लीत सर्वात जास्त डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मृतांची संख्या अधिक आहे. बिहारमध्ये ही संख्या 97 तर उत्तर प्रदेशात 79 इतकी आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यू झालेल्या डॉक्टरांपैकी 45 टक्के डॉक्टर हे या तीन राज्यातील आहेत.
तर मागील वर्षी या महामारीत जवळपास 1,300 डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला होता. दुसऱ्या लाटेत हा आकडा 646 इतका आहे. दुसऱ्या लाटेत आंध्र प्रदेशात 35 डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. आसाम 8, छत्तीसगड 05, गुजरात 37, गोवा 02 तर हरियाणा 03, झारखंड 39, मध्य प्रदेश 16, राजस्थान 43, वेस्ट बंगाल 30 आणि महाराष्ट्रातील 23 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.