मासेविक्रेत्याकडून झाला प्रसार : पती-पत्नी पॉझिटिव्ह : डॉक्टरसह अन्य चारजण संशयित : मांगोर हिल कंटेनमेंट झोन जाहीर
प्रतिनिधी / वास्को
वास्कोतील मांगोर हिल भागात कोरोना रूग्ण आढळून आल्याने आणि कोरोनाचा सामूहिक प्रसार सुरू झाल्याचे निष्पन्न झाल्याने सोमवारी दुपारनंतर संपूर्ण मुरगाव तालुक्यात खळबळ उडाली. वास्कोतील पोलिसांनी संपूर्ण मांगोर हिल वस्ती बंद केली आहे. वास्कोतील नागरिकांमध्ये या प्रकरणामुळे भिती पसरली आहे. मांगोर हिलची वस्ती कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली या वस्तीतील सर्व व्यवहार, व्यवसायही बंद करण्यात आले आहेत.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी गेलेल्या जोडप्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दुपारी वास्कोत पसरली. त्यानंतर या कुटुंबातील अन्य काही जणांना तसेच त्यांच्या संपर्कातील वास्कोतील एका डॉक्टरालाही कोरोना झाल्याची माहिती पसरली. ही माहिती दुपारी वास्को पोलिसस्थानक तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकाऱयांना उपलब्ध होताच आपत्ती व्यवस्थापनासाठी त्यांचीही धावपळ सुरू झाली.
मांगोर हिल झोपडपट्टी सील
प्रशासकीय अधिकाऱयांनी लगेच संपूर्ण मांगोरहिलची झोपडपट्टी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या वस्तीकडे जाणाऱया सर्व मार्गावर पोलिसांनी अडथळे उभे केलेले असून ठिकठिकाणी पोलीसही तैनात करण्यात आलेले आहेत.
कोरोनाबाधित दोन्ही कुटुंब परप्रांतीय
उपलब्ध माहितीनुसार कोरोनाबाधीत म्हणून उघडकीस आलेला डॉक्टर व ते जोडपे ही दोन्ही कुटुंबे परप्रांतीय असून मांगोर हिल भागातच हा डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करतो. कोरोनाबाधित झालेले झोडपे मासे विक्रेत्यांपैकी आहे. पतीकडूनच या कुटुंबात कोरोना पसरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या कुटुंबातील दोन मुलगे व एक गरोदर सूनही कोरोनाबाधीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांचा एक मुलगा पोलीस असून तो कोरोनाबाधीत असल्याने खात्यातील त्याच्या काही सहकाऱयांनाही आता क्वारंटाईन व्हावे लागण्याची शक्यता आहे.
रविवारी रात्री डॉक्टरांना भेटले होते
मिळालेल्या माहितीनुसार मांगोर हिलच्या वस्तीतील सदर जोडपे ताप येत असल्याने रविवारी रात्री या वस्तीतील या डॉक्टरकडे गेले होते. या डॉक्टरांनी त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्याची सूचना केली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी ती दोघे चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असता त्यांना त्वरित गोमेकॉमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतरच्या तपासणीत ती दोघे कोरोनाबाधित असल्याचे उघडकीस आले.
नातेवाईक, डॉक्टर, नर्सचे क्वारंटाईन
उपलब्ध माहितीनुसार त्या दोघांना चिखलीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले त्यांचेच एक नातेवाईक तसेच चिखलीच्या हॉस्पिटलमधील संबंधीत डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱयांना खबरदारीसाठी हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेले असून त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
साखळी वाढण्याच्या शक्यतेने चिंता
कोरोनाबाधित झालेले कुटुंब मांगोरहिलच्या वस्तीत बऱयाच वर्षांपासून वास्तव्यास आहे. डॉक्टर मांगोरहिलपासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर राहतात. मासे विक्री व्यवसायातील या कुटुंबातील महिला वैद्यकीय तपासणीसाठी त्या डॉक्टरांकडे गेली होती. तिच्यामुळे डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता असून डॉक्टर कोरोनाबाधित झाल्याने त्यांचे कुटुंबीयही भितीच्या सावटाखाली आले आहे. वास्कोतील ही कोरोना प्रसाराची साखळी मोठी असण्याची शक्यता निर्माण झाल्याने सध्या चिंता पसरलेली आहे. या प्रकरणामुळे गोव्यात पहिल्यांदाच कोरोनाचे सामाजिक संक्रमणाचा प्रकार उघडकीस आला आहे.
झोपडपट्टीकडे जाणारे सर्व रस्ते रोखले
मांगोर हिल वास्कोतील झोपडपट्टी ही दाट वस्ती असून या वस्तीत नव्वद टक्के परप्रांतीय लोक दाटीवाटीने राहतात. त्यामुळे अधिक सामूहिक प्रसाराची भिती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या स्थानिक प्रशासनाने या वस्तीत कुणी प्रवेश करणार नाही आणि कुणी वस्तीतून बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेणे सुरू केले आहे. सोमवारी संध्याकाळपासून वास्को शहरातून मांगोर हिलकडे जाणारा रस्ता मांगोर हिलच्या सेंट तेरेझा हायस्कूल तसेच मांगोर हिलच्या प्रमुख नाक्यावर रोखलेला आहे. तसेच वरूणापुरी नाक्यावर रस्ता रोखण्यात आलेला आहे. बायणामार्गे मांगोर हिलच्या वस्तीत कुणी प्रवेश करू नये यासाठी अंबाबाई मंदिराजवळच्या रस्त्यावरही कडे करण्यात आलेले आहे. त्यामुळे सध्या या वस्तीत कुणालाही मुक्त प्रवेश करता येणार नाही. वास्को मांगोर हिलमधील या सामूहिक प्रसारामुळे संपूर्ण मुरगाव तालुक्यात खळबळ आणि चिंता पसरलेली आहे.
मांगोर हिलमधील व्यापार व्यवसाय बंद
कोरोनाचा सामूहिक प्रसार आढळून आल्याने व मांगोर हिलची पूर्ण वस्ती कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आल्याने या वस्तीतील सर्व व्यवसाय बंद करण्यात आलेले आहेत. सर्व दुकाने संध्याकाळपासून बंद करण्यात आली आहेत.
गोवा शिपयार्डचे आवाहन
मांगोर हिलमध्ये कोरोना रूग्ण आढळून आल्याची दखल गोवा शिपयार्डनेही घेतली आहे. गोवा शिपयार्डचे जे कामगार, कर्मचारी व अधिकारी मांगोर हिल भागात राहतात अशा कर्मचाऱयांनी गोवा शिपयार्डमध्ये कामावर प्रत्यक्ष हजर न होता वर्क फ्रॉम होम पध्दतीचा अवलंब करावा, असे आवाहन शिपयार्ड व्यवस्थापनाने केले आहे.