कामथे रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघड
प्रतिनिधी/ चिपळूण
एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी मोठमोठय़ा घोषणा केल्या जात असतानाच मृत्यूनंतर त्यांच्यासाठी बॉडी कव्हर बॅगाही उपलब्ध होताना दिसत नाहीत. कामथे रुग्णालयात शुक्रवारी चादरीतच मृतदेह लपेटून ठेवण्याचा धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर हा प्रकार व्हायरल झाल्यानंतर तालुकाभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
गत 2 महिन्यापांसून शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच या उपचारातील बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. तालुक्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या कामथे रुग्णालयात मोठय़ा संख्येने रुग्ण उपचार घेत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून मात्र या रुग्णालयाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसत आहे. आतापर्यंत या महामारीत चिपळुणातील विविध संस्था व दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीच्या बळावर कामथे रुग्णालयाने महत्वपूर्ण भूमिका बजावली. अगदी ऑक्सिजन बेड वॉर्ड, सीसीटीव्ही, बोअर खोदाई, औषध, वैद्यकीय उपकरणे, रुग्णालय साफसफाईपासून ते अगदी खराटा, बादली, झाडू, असे साहित्यही पुरवले आहे. असे असतानाच बॉडी कव्हर बॅगसारख्या आवश्यक त्या गरजा जिल्हा आरोग्य प्रशासन पुरवत नसेल तर कोविडचा निधी नेमका कोठे जातो, असा सवाल शुक्रवारच्या प्रकारानंतर उपस्थित केला जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कामथे उपजिल्हा रुग्णालयात बॉडी कव्हर बॅगचा सातत्याने तुटवडा निर्माण होत आहे. 2 दिवसापूर्वी या रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयाकडे 50 बॅगची मागणी केली असता अवघ्या 5 मिळाल्या. अशातच रुग्णालयातील मृत व्यक्तींचे प्रमाण वाढल्याने शुक्रवारी रात्री एकही बॅग शिल्लक नव्हती. त्यामुळे या रुग्णालयातील एक मृतदेह चक्क चादरीत लपेटून ठेवण्यात आला होता. या बाबतचा फोटो व माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.
दरम्यान, या प्रकाराची गंभीरपणे दखल घेत आमदार शेखर निकम यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा केली. त्यानुसार शनिवारी सकाळी कामथे रुग्णालयास 10 बॉडी कव्हर बॅग पाठवण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकाऱयांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणीही निकमांकडून करण्यात आली.
नियमावलीचे काय?
कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर पुढे काय करायचे, या बाबतची शासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसारच पुढील प्रक्रिया केली जाते. अगदी मृतदेहही नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात नाहीत, असे असताना कामथे रुग्णालयातील या धक्कादायक प्रकाराबाबत कोण कोणाला जबाबदार धरणार, हा प्रश्न आहे.