ऑनलाईन टीम / लंडन :
कोरोनाबाधित असतानाही ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात हजेरी लावणाऱ्या महिला खासदार मार्गारेट फेरीयर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
फेरीयर या स्कॉटीश नॅशनल पार्टीच्या खासदार आहेत. कोरोनाबाधित असूनही त्यांनी बुधवारी ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात प्रवेश केला. तसेच सभागृहात चार मिनिटे भाषण केले. त्यानंतर त्यांनी लंडन ते एडिंबरा हा प्रवास सार्वजनिक वाहनाने केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत फेरीयर यांची स्कॉटीश नॅशनल पार्टीने पक्षातून हकालपट्टी केली.
स्कॉटीश नॅशनल पार्टीच्या प्रमुख मंत्री निकोला स्टरजेन यांनी खासदार फेरीयर यांना आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला सांगितले आहे. घडल्या प्रकाराबद्दल खासदार मार्गारेट फेरीयर यांनी संसदेची माफी मागितली आहे. मात्र, त्यांची पोलीस चौकशी होऊन त्यांना कोविड-19 निर्बंधांचा भंग केल्याप्रकरणी चार हजार पौंड (भारतीय चलनानुसार अंदाजे पावणे चार लाख रुपये) दंड होऊ शकतो.