अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 3 नोव्हेंबर 2021, सकाळी 11.30
● जिल्ह्यात रूग्णवाढीवर नियंत्रण
● सातारा, फलटण, कराडसह तालुके सावरले
● घरोघरी उत्साहाचे दीप उजळले
● लसीकरणाचा वेग वाढवण्यात प्रशासन यशस्वी
● 24 तासात वाढले 31 नवे रूग्ण
● कोरणामुक्त गावांची संख्या वाढली
सातारा / प्रतिनिधी :
कोरोनाच्या गर्तेतून बाहेर पडत सातारा जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू आहे. जिल्ह्यातील हॉटस्पॉट ठरलेले सातारा, फलटण, कराड, कोरेगांव, खटाव तालुके आता सावरले असून उर्वरित तालुक्यातही कोरोनामुक्त गावांची संख्या वाढली आहे. सोमवारपासून दिपोत्सवाला प्रारंभ झाला आहे. गेल्या वर्षात कोरोनाच्या भयग्रस्त वातावरणात दिपोत्सव साजरा करणारे जिल्हावासियांचा यंदा मात्र उत्साह वाढला आहे. गेल्या दीड महिन्यातील सणासुदीच्या काळातील आकडेवारी पाहता जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिपोत्सवाकडे सुरू असल्याचे दिसते. दरम्यान गेल्या 24 तासात 31 रूग्णांची वाढ झाली आहे.
तीन दिवसात अर्थचक्राला गती
जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढीचा आकडा आटोक्यात आल्याने रविवार, सोमवारी आणि मंगळवारी सातारा,कराड, फलटणसह इतर शहरातील बाजारपेठा कोरोनापुर्व काळासारख्या गजबजल्या होत्या. मास्कचा वापर करत जिल्हावासियांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. त्यामुळे ठप्प झालेली आर्थिक उलाढालीची चक्रे पुन्हा फिरायला मदत झाल्याचे संकेत मिळाले. कोरोना रूग्णवाढ अशीच घसरत राहिल्यास जिल्ह्याचे अर्थचक्र पुन्हा त्याच वेगाने धावेल असा विश्वास व्यापारी वर्गाने व्यक्त केला.
चाचण्यांची संख्या तीन हजारांच्या खाली
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख कमालीचा घसरला असून गेल्या 24 तासात 31 रूग्णांची वाढ झाली आहे. जिल्हाभरात 2 हजार 735 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत. या आकडेवारीनुसार जिल्ह्याचा गत 24 तासातील पॉझिटिव्हीटी रेट 1.13 आहे. चाचण्यांची संख्याही लक्षणीय घटली असून अपवाद वगळता तीन हजारांच्या खाली चाचण्यांची संख्या आली आहे.
राज्यातही दिलासादायक स्थिती कायम
गेल्या 24 तासातील राज्यातील आकडेवारीवर नजर टाकल्यास एकूण सक्रीय रुग्ण संख्याही 15 हजारांवर आली आहे. कमी होत असलेला हा आलेख दिलासादायक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,24 तासात दिवसभरात राज्यात 809 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवारपर्यंत
एकूण नमुने 22,35,330
एकूण बाधित 2,51,371
कोरोनामुक्त 2,43,544
एकूण मृत्यू 6,433
सक्रीय रुग्ण 520
जिल्हय़ात मंगळवारी
बाधित 31
मुक्त 62
मृत्यू 00, उशिरा नोंद 2