दीपक प्रभावळकर / सातारा
जगात पाच लाखाहून अधिकांचा जीव घेणाऱया कोरोनावर संपुर्ण भारतीय बनावटीची जगातली पहिली लस-व्हॅक्सीन तयार झाली असून भारतीय स्वातंत्र्यदिनी त्याचे लॉन्चींग होणार असल्याचे संकेत पुण्याच्या एनआयव्हीमधून मिळत आहेत. गेल्या कित्येक शतकातील सर्वात भयानक महामारीवर अद्याप जगभरात कोणतीही लस उपलब्ध नाही. हैद्राबादच्या भारत बायोटेकने ‘कोव्हॅक्सीन’ ब्रँडनेमने बनवलेल्या व्हॅक्सीनची देशभरात बारा ठिकाणी मानवी चाचण्या सुरू झाल्या असून त्यात बेळगावसह गोव्याचा समावेश आहे.
कोरोनाने साऱ्या जगाला व्यापून टाकले आहे. जगभरात सुमारे २ कोटी तर देशात ६ लाख लोकांना लागण झाली असून जगात ५ लाख २० हजार जणांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर लस शोधण्याचे काम जगभरातल्या ३०० संस्था काम करत असल्या तरी केवळ १५ चाचण्या मानवीय ट्रायल्सपर्यंत पोहोचल्या आहेत. भारत बायोटेक, आयसीएमआर व पुण्याच्या नॅशनला इंन्स्टीटय़ुट ऑफ व्हायरोलॉजी म्हणजेच एनआयव्हीने ‘कोव्होक्सीन’वर संयुक्त काम केले आहे. क्निनिकल चाचण्या पुर्ण करून आता मानवी चाचणीपर्यंत याच्या ट्रायल्स सुरू आहेत. देशातील बेळगाव, गोव्यासह विशाखापट्टणम, रोहतक, नवी दिल्ली. पटणा, नागपुर, गोरखपुर, कट्टनकुलर, हैद्राबाद, कानपुर व आर्यानागपुर या १२ ठिकाणी हे काम टॉपमोस्ट प्रायोरिटीवर करण्याचे आदेश केंद्राच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. सध्याच्या वेगाने या चाचण्या पुर्ण करून १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी ही संपुर्ण भारतीय बनावटीची लस शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सार्वजनिकरित्या वापरली जाणार आहे.
जगात या महामारीवर कोणतीही लस उपलब्ध नसताना कोविड-१९ वर बीबीव्ही १५२ कोविडव्हॅक्सीन ही लस कोव्हॅक्सीन पुर्ण होत असताना आजवर लस बनवण्याच्या भारताच्या सर्वात्तम कामगिरीवर पुन्हा एकदा मोहर उठणार आहे.
मोदींनी वितरणाचा बनवला प्लॅन
स्वातंत्र्यदिनी लाँच होत असलेली ही लस देशाच्या कानाकोपऱयांत पोहोचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. त्यामध्ये कोरोना रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स, आरोग्यकर्मी, कोरोना योद्धा, प्रशासन यांना प्राध्यान्य देण्याबरोबरच देशात सर्वत्र उपलब्ध होण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय झाला आहे.
टॉसिलीझुमॅब चा होतोय तुटवडा
कोरोनावर सर्वात जास्त असरदार इंजेक्टेबल ठरलेल्या टॉसिलीझुमॅबचा देशभर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळेही लस येण्याकडेच साऱ्या जगाचे लक्ष लागलेले आहे.
रिकॉम्बॅक्ट बीसीजीचे परिणाम सप्टेंबरपर्यत येणार
इंग्लंडच्या ऑक्सफर्ड युनिव्हरसीटीसोबत काही संस्था व्हॅक्सीनवर मोठय़ा वेगाने काम करत आहेत. पुण्याची सिरम इंन्सीटय़ुट ऑक्सफर्डसह अमेरिकेतल्या रिकॉम्बॅक्ट बीसीजी या लसींवर काम करत असून देशातल्या ८० संस्थासोबत त्यांनी मानवी चाचण्या केल्या आहेत. महाराष्ट्रात एकुण ९ संस्थांमध्ये या चाचण्या झाल्या असून त्यात कराडच्या कृष्णासह कोल्हापुरच्या सीपीआरचाही समावेश आहे.
भारतात बीसीजीची लस देण्यात येते त्यामुळेच भारतात मॉरटॅलिटी रेट खुप कमी असल्याचे मानले जाते. त्याच संदर्भाने रिकॉम्बॅक्ट बीसीजी ही लस शोधण्याचे काम सुरू झाले होते. याच्याही मानवी चाचण्यांचे योग्य परिणाम सप्टेंबरपर्यत येण्याची शक्यता आहे, असेही सुत्रांकडून सांगण्यात आले आहे .