मॉडर्ना कंपनीची लस 94.5 टक्के प्रभावी : 8 अंश सेल्सिअसमध्ये 30 दिवसांपर्यंत सुरक्षित
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
अमेरिकेतील मॉडर्ना या बायोटेक कंपनीने कोविड-19 लसीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. ही लस कोरोनाबाधितांना वाचविण्यास 94.5 टक्क्यापर्यंत प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा दावा अंतिम टप्प्यातील चाचण्यांच्या निष्कर्षांच्या आधारावर करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे ही लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात 30 दिवसांपर्यंत सुरक्षित राहू शकते.
तिसऱया टप्प्यातील चाचणीत अमेरिकेतील 30 हजारांहून अधिक जणांना सामील करण्यात आले होते, यात 65 पेक्षा अधिक जण अतिजोखीम असलेले तसेच विविध समुदायांशी संबंधित होते. हे यश म्हणजे लसीच्या विकासातील एक महत्त्वाचा क्षण असल्याचे उद्गार मॉडर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बॅन्सेल यांनी काढले आहेत.
आपत्कालीन वापराची मंजुरी
आपत्कालीन स्थितीत लसीचा वापर करण्याची मंजुरी मिळविण्यासाठी मॉडर्ना आगामी आठवडय़ांमध्ये फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशनकडे अर्ज करणार आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत अमेरिकेत या लसीचे 2 कोटी डोस उपलब्ध असतील, अशी अपेक्षा आहे. तर पुढील वर्षापर्यंत जगात 50 कोटी ते 1 अब्ज डोस तयार करण्याची योजना आहे.
आतापर्यंतची सर्वात प्रभावी लस
यापूर्वी अमेरिकेतील कंपनी फायजर आणि त्याची भागीदार जर्मनीच्या बायोएनटेक कंपनीने 90 टक्क्यांहून अधिक उपयुक्त लस निर्मिल्याचा दावा केला होता. तर रशियाच्या स्पुतनिक 5 लसीचा प्रभाव 92 टक्के राहिल्याचा दावा करण्यात आला होता. जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकेतील आणखी एका कंपनीने स्वतःच्या लसीच्या दोन डोसची तिसऱया टप्प्यातील चाचणी सुरू केली आहे.
कोल्ड स्टोरेजची समस्या संपणार
लसीला अत्यंत थंड तापमानात ठेवण्याची गरज नाही, ही लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात 30 दिवसांसाठी रेफ्रीजरेट करता येते असे मॉडर्नाने म्हटले आहे. बायोएनटेक आणि फायजर लसीच्या तुलनेत हा कालावधी खूपच अधिक आहे. उणे 20 अंश सेल्सिअस तापमानात ही लस 6 महिन्यापर्यंत तर खोलीच्या सामान्य तापमानात 24 तासांपर्यंत सुरक्षित राहू शकते. फायजरची लस सामान्य फ्रीजमध्ये केवळ 5 दिवसांपर्यंत सुरक्षित राहू शकते. अधिक काळ संग्रहित करण्यासाठी ही लस उणे 70 अंश सेल्सिअस तापामानात ठेवावी लागणार आहे. लसीला मोठय़ा लोकसंख्येपर्यंत पोहोचविण्यातील सर्वात मोठा अडथळा त्याच्या स्टोरेजचीच आहे.
महामारी संपण्याची अपेक्षा
मॉडर्नाची घोषणा प्रत्यक्षात अत्यंत चांगली बातमी आहे. ही घोषणा खरोखरच उत्साह वाढविणारी आहे, कोविडसाठी लस तयार होण्याची पूर्ण शक्यता असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे ऑक्सफोर्ड विद्यापीठात ग्लोबल हेल्थ नेटवर्कचे संचालक प्रा. ट्रुडी लँग यांनी म्हटले आहे.
सर्वात आश्वासक पाऊल
मॉडर्नाची घोषणा महामारीवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने सर्वात आश्वासक पाऊल असल्याचे वाटते. कंपनीचा डाटा अत्यंत प्रभावी असल्याचे उद्गार नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऍलर्जी अँड इन्फेक्शियस डिसिजचे संचालक डॉ. अँथनी फौसी यांनी काढले आहेत. विश्लेषणात सुरक्षेशी संबंधित कुठलाच मुद्दा समोर आलेला नाही. डिसेंबरच्या अखेरपर्यंत मॉडर्ना आणि फायजर दोघांच्याही लस अतिजोखीम शेणीतील लोकांसाठी उपलब्ध होतील. तरीही लोकांना मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी प्रेरित करत रहावे लागणार असल्याचे फौसी म्हणाले.