चीनला लागून सीमा तरी एकही बळी नाही
जगात कोरोना विषाणूचा आतापर्यंत 31 लाख 50 हजार 478 जणांना संसर्ग झाला आहे. तर 2 लाख 18 हजार 466 जणांना या विषाणूमुळे जीव गमवावा लागला आहे. या संकटावर मात करणाऱयांची संख्या 9 लाख 64 हजार 161 वर पोहोचली आहे. तर चीनला सीमा लागलेली असूनही व्हिएतनाममध्ये कोरोनामुळे एकाचाही बळी गेलेला नाही. व्हिएतनाम येथे आतापर्यंत केवळ 270 रुग्ण सापडले आहेत. तेथील सरकारने जानेवारी महिन्यातच देशाची सीमा बंद केली होती. तर चीनमध्ये आतापर्यंत 4,633 जणांचा मृत्यू झाला आहे.
चीन : संसदेचे वार्षिक अधिवेशन
चीनमध्ये 22 मेपासून संसदेचे वार्षिक अधिवेशन आयोजित होणार आहे. 13 व्या नॅशनल पीपल्स काँग्रेसचे तिसरे अधिवेशन मार्चमध्ये आयोजित होणार होते, परंतु महामारीमुळे अधिवेशन लांबणीवर टाकण्यात आले होते. चीनमध्ये मागील 24 तासांत 22 नवे रुग्ण सापडले असून यातील 21 जण विदेशातून आलेले नागरिक आहेत. तर एक रुग्ण गुआंगडोंग प्रांतात आढळून आल्याची माहिती नॅशनल हेल्थ कमिशनने दिली आहे.
न्यूयॉर्कमध्ये 3 लाख रुग्ण
अमेरिकेत मागील 24 तासांमध्ये 2,208 जणांचा बळी गेला आहे. तर एकूण बळींचा आकडा 59,226 झाला आहे. हा आकडा 1955 ते 1975 पर्यंत चाललेल्या व्हिएतनाम युद्धात मृत्युमुखी पडणाऱयांपेक्षाही अधिक झाला आहे. केवळ न्यूयॉर्क प्रांतातच 3 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. तर 22 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
उपाध्यक्षांकडून नियमांचे उल्लंघन
अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी रुग्णालयाच्या मास्क परिधान करण्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन केले आहे. मेयो क्लीनिक रुग्णालयात जात त्यांनी कोरोनावर संशोधन करणाऱयांची भेट घेतली होती. रुग्णालयाकडून सर्वांवर मास्क परिधान करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. अमेरिकेचा उपाध्यक्ष म्हणून माझी कोरोनाची नियमित चाचणी होत असते. डिसीज कंट्रोल सेंटरने मास्क परिधान करणे आवश्यक ठरविले नसल्याचा दावा पेन्स यांनी केला आहे.
स्वीडनमध्ये लॉकडाउन नाही
महामारीदरम्यान सर्व देशांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आले असले तरीही स्वीडनमध्ये सरकारने कुठलीच बंधने लागू केलेली नाहीत. स्वीडनमधील लोक स्वतःच नियमांचे पालन करत आहेत. तेथे कुठल्याही आदेशाशिवायच लोक सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत आहेत. स्वीडन बऱयाच प्रमाणात अन्य काही देशांप्रमाणेच संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.
इटलीत 27,359 बळी
इटलीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 27,359 झाली आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या 2,01,505 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत 382 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इटलीच्या नागरी सुरक्षा विभागाचे प्रमुख अँजेलो बोरेली यांनी दिली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी मृतांच्या संख्येत किंचित वाढ दिसून आली आहे. देशात 10 मार्चपासून लॉकडाउन असून 3 मेपर्यंत लागू राहणार आहे. 21 फेब्रुवारी रोजी इटलीत पहिला रुग्ण सापडला होता. 4 मेपासून टाळेबंदी शिथिल करण्याची योजना तेथील सरकार आता आखत आहे.
फ्रान्सकडून रुपरेषा
फ्रान्समध्ये आतापर्यंत 23,660 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान एडोर्ड फिलिप यांनी संसदेत टाळेबंदीतून बाहेर पडण्याच्या उपाययोजनांची रुपरेषा मंगळवारी मांडली आहे. टाळेबंदी लागू केल्याने महिन्याभरात सुमारे 62 हजार जणांचा जीव वाचला आहे. परंतु अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्यासाठी टाळेबंदीच्या काही नियमांमध्ये सूट देण्याची वेळ आली आहे. 11 मेपासून टाळेबंदी शिथिल केली जाणार आहे. लस किंवा कायमस्वरुपी उपचारपद्धत सापडेपर्यंत आम्हाला या विषाणूसोबत जगावे लागणार असल्याचे फिलिप म्हणाले.
तुर्कस्तानात रुग्ण वाढले
पश्चिम आशियातील देश असलेल्या तुर्कस्तानात कोरोनाबाधितांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. तेथील राष्ट्रीय विमानसेवा कंपनी तुर्किश एअरलाईन्सने 28 मेपर्यंत स्वतःची विमानसेवा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 24 तासांत 2392 नवे रुग्ण सापडले असून 92 जणांचा मृत्यू झाला आहे. तुर्कस्तानातील एकूण बाधितांचा आकडा वाढून 1 लाख 14 हजार 653 झाला आहे. तर बळींची संख्या 2,992 वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री फाहरेतिन कोजा यांनी दिली आहे. 11 मार्च रोजी तुर्कस्तानात पहिला रुग्ण आढळला होता.
रशियात पीपीईची टंचाई
रशियात महामारी अद्याप टोकाला पोहोचली नसल्याचे म्हणत राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी 11 मेपर्यंत टाळेबंदी वाढविली आहे. तसेच पुतीन यांनी पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटची (पीपीई) कमतरता असल्याचे मान्य केले आहे. व्यापक स्तरावर उत्पादन तसेच आयात करूनही कमतरता दूर करणे शक्य झालेले नाही असे पुतीन यांनी म्हटले आहे. रशियात 99,399 रुग्ण सापडले असून 972 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियातील अनेक प्रांतांमध्ये कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. रशियातील अतिथंड हवामानामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे.