मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे जनतेला आवाहन
प्रतिनिधी / बेंगळूर
जनतेने लस घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढय़ात राज्य सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केले आहे. राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने येडियुराप्पा यांनी कोरोना नियंत्रणातील आपली जबाबदारी जनतेते जाणून घ्यावी, अशा आशयाचे आवाहन ट्विटरवर केले आहे.
कोरोना संसर्गाकडे दुर्लक्ष करू नका. आपण स्वतः देखील कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे अभियान सुरू असून ज्यांनी अद्याप लस घेतली नाही त्यांनी लसीकरणासाठी पुढे यावे. लस पुर्णतः सुरक्षित असून कोरोनाला प्रतिबंध घालण्यात हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. लस घेण्याबरोबरच मास्कचा वापर, सामाजिक अंतर तसेच कोविड मार्गसूचीतील इतर नियमांचे जनतेने काटेकोर पालन करण्यास विसरू नये, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असून त्याचे साईड इफेक्ट्स नाहीत. शिवाय शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होणार आहे. ही लस तुमच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी देते, असेही मुख्यमंत्र्यांनी ट्विटवर नमूद केले आहे.