भारतीय हवाई दलाकडून वैद्यकीय साहित्याची वाहतूक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात सध्या चिंताजनक परिस्थिती असून अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यांकडून केंद्राकडे ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची वारंवार मागणी केली जात आहे. संकटाच्या या काळात भारतीय हवाई दलाने केंद्राच्या मदतीला धाव घेतली आहे. भारतीय हवाई दलाकडून ऑक्सिजन कंटेनर्स, सिलेंडर्स, महत्वाची औषधे, साहित्य आणि कोरोनाशी लढण्यासाठी सरकारला मदत करणाऱया वैद्यकीय कर्मचाऱयांना एअरलिफ्ट केले जात असून या कामात हवाई दलाची मोठी मदत होत आहे. तसेच आता लष्करानेही आपली इस्पितळे कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्याने संरक्षण मंत्रालयाकडून त्यासंबंधीची रितसर योजना आखली जात आहे.
भारतीय हवाई दलाने ट्विट करत कोरोनाविरोधातील लढाईत वेगाने वाहतूक करत भारतीय हवाई दल मदत करत आहे. वैद्यकीय कर्मचारी, महत्वाची सामुग्री आणि औषधे देशभरातील कोरोना रुग्णालये आणि सुविधांमध्ये पोहोचवण्याचे काम सुरु असल्याची माहिती दिली आहे. या मदत पुरविण्याच्या अनुषंगाने संरक्षण मंत्रालयीन पातळीवर स्वतंत्र नियोजन केले जात आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अधिकाऱयांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी देशभरात राज्य सरकारांना मदतीसाठी रोडमॅप आखण्यास सांगितले. संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावतदेखली यावेळी उपस्थित होते.
दिल्लीमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) रुग्णालय उभे करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. या रुग्णालयामध्ये कर्मचारी सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोची, मुंबई, विशाखापट्टणम आणि बेंगळूरमधून डॉक्टर आणि परिचारिकांना एफरलिफ्ट करण्यात आल्याची माहिती हवाई दलाकडून देण्यात आली. तसेच दिल्लीमधील कोरोना केंद्रांसाठी बेंगळूर येथून ऑक्सिजन कंटेनर्स एअरलिफ्ट करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
लष्कराच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार? हवाई दल कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी गतिमान झाले असतानाच लष्करानेही आपली काही इस्पितळे कोरोनाच्या रुग्णांसाठी खुली करण्याची तयारी दर्शवली आहे. देशाच्या विविध भागात लष्करातर्फे रुग्णालये चालवली जातात. देशात कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराची रुग्णालये सामान्य नागरिकांसाठी खुली केली जाऊ शकतात. जनरल मनोज नरवणे यांनी यासंबंधी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यात यासंबंधी बोलणी सुरू आहेत. याशिवाय आपत्कालीन खरेदीचे अधिकारही लष्कराला देण्यात आले आहेत. सोबतच लसीकरण झालेल्या निवृत्त लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱयांचीही कोरोनाविरोधातील लढाईत मदत घेण्याचा विचार सुरू आहे.