मराठी यू-टय़ूब चॅनेल सुरू करून कोरोनाबाबत अजिंक्मय आणि अमेय जोशी बंधू करताहेत जागृती
बेळगाव / प्रतिनिधी
वेळेवर घालण्यात येणारा एक टाका पुढचे नऊ टाके वाचवितो, अशी एक इंग्रजी भाषेतील म्हण आहे. सध्याच्या कोरोनाची परिस्थिती हाताळताना या म्हणीची कृतीशीलता आचरणात आणण्याची कामगिरी जपानी बांधवांनी केली आहे. स्वाईन फ्लूपासून घेतलेला धडा मार्गदर्शक ठरत आहे. त्यामधून बरेच काही शिकण्याजोगे आहे, असे मत जपानमध्ये शिकणारे बंधू अजिंक्मय आणि अमेय जोशी यांनी मांडले.
बेळगाव जिल्हय़ातील येड्डूर (ता. चिकोडी) येथे अजोळ असणारे आणि सांगली येथील रहिवासी असणाऱया अजिंक्मय आणि अमेय शशिकांत जोशी या दोन्ही बंधूंचे वास्तव्य सध्या जपानमध्ये आहे. शिक्षण घेतानाच नोकरीची जबाबदारी सांभाळण्याचे काम ते करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी तेथील परिस्थितीबद्दल माहिती दिली.
सुमारे 10 वर्षांपूर्वी आलेल्या स्वाईन फ्लूमध्ये जपानने बरीच दक्षता घेतली. तेथून पुढे आरोग्य शिस्तीचा धडा घेण्याचे ठरविले. त्यामुळे अनेक वर्षे मास्क लावून वावरणे हा जपानी रहिवाशांच्या दिनचर्चेचा भाग बनला आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग हीदेखील नियमित स्वरुपात राबविली जाणारी पद्धत बनली आहे. त्यामुळे कोठेही गर्दी झाल्याचे दिसत नाही. यामधून संसर्ग रोखण्यासाठीचे उपाय हे तेथील रहिवाशांनी आपल्या अंगी बाणवले आहेत. स्वच्छता, आरोग्य दक्षता आणि नियोजन अशा त्रिसूत्रीमुळे तेथे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला आहे. जपानी लोकांची स्वच्छता आणि त्यांचे व्यवस्थापन याबाबत नेहमी कौतुक होते, त्याची प्रचिती सध्या येत आहे.
जपानमधील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, काही ठराविक शहरे वगळता जपान पूर्णपणे सुरक्षित आहे. या देशामध्ये आवश्यक दक्षता, योग्य स्वच्छता यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. त्याचप्रमाणे राष्ट्राचा विचार प्रथम करून योग्य नियम पालन यावर भर दिला जातो. आणीबाणीच्या कालावधीत शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे गर्दी होऊ नये यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. औद्योगिक कंपन्या आपल्या कर्मचाऱयांची आरोग्य तपासणी नित्यनेमाने करीत आहेत. लॉकडाऊन हा स्वयंस्फूर्तीने पाळला जातो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. यामधूनच कोरोनावर नियंत्रण शक्मय झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
अजिंक्मय आणि अमेय यांच्या आई-वडिलांशी संवाद साधला असता, त्यांनी आपल्या मुलांच्या कामगिरीचा अभिमान प्रकट केला. त्याचबरोबर त्यांनी तेथे आरोग्याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही केली.
शशिकांत जोशी हे मूळचे येडूर (ता. चिकोडी) येथील रहिवासी आहेत. स्टेट बँकेतील नोकरीच्या निमित्ताने ते सांगली येथे राहिले आहेत. त्यांनी आपल्या भारतीय मंडळींना आरोग्यविषयक दक्षता घ्यावी, अशी सूचना केली.
दररोज नव्या मास्कची भेट
संसर्गापासून दक्षतेसाठी येथील शिक्षण संस्था परिपूर्ण नियोजन करीत आहेत. आम्हा विद्यार्थ्यांना आरोग्य रक्षणासाठी सूचना दिल्या जात आहेत. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझरची सुविधा आहे. संस्थेत येण्याच्या वेळी दररोज एक मास्क नव्याने दिला जातो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर लगेच एक वेट टिश्यू पेपरही दिला जातो, अशी सर्व दक्षता घेण्याचे व्यवस्थापन जपान राष्ट्राने रुजविले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मराठी यू-टय़ूब चॅनेलचा कार्यारंभ
अजिंक्मय आणि अमेय यांनी जपानमध्ये आपल्या काही मराठी सहकाऱयांसह जपान भटकंती हे यू-टय़ूब चॅनेल सुरू केले आहे. या माध्यमातून कोरोनाविषयक जागृती करण्याचा प्रयत्न आहे. जपानमधील आवश्यक माहिती मराठीतून देण्याची व्यवस्थादेखील या बंधूंनी केली आहे. त्यामुळे हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.