रियाध / वृत्तसंस्था
नियंत्रणात आलेला कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्यामुळे सौदी अरेबियाने पुन्हा एकदा नियम कडक केले आहेत. स्थानिक पातळीवर विविध निर्बंध लागू करण्याबरोबरच भारत, अमेरिकेसह जगातील 20 देशांच्या प्रवासी विमानांना सौदी अरेबियाने प्रवेशबंदी जाहीर केली आहे. बुधवारपासून 20 देशातील प्रवासी विमानांना प्रवेशबंदी लागू करत असल्याचे अंतर्गत व्यवहार मंत्र्यांनी जाहीर केले. ही प्रवेशबंदी कधीपर्यंत असेल याबाबत आत्ताच स्पष्टोक्ती देण्यात आलेली नाही.
सौदी अरेबियात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे सरकारने कडक नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. अन्य देशांमधून येणारे प्रवासीही पॉझिटिव्ह आढळत असल्यामुळे भारतासह पाकिस्तान, अमेरिका, ब्राझील, जपान, ब्रिटन, इटली, पोर्तुगाल, फ्रान्स, स्वीडन, जर्मनी, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड या देशांसाठी ‘विमानबंदी’ लागू केली आहे. प्रवेशबंदीच्या या नियमातून राजनैतिक अधिकारी, सौदीचे नागरिक, डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोकळीक देण्यात आली आहे. सौदीत सध्या ‘पी-फायझर’ या लसीच्या माध्यमातून सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे.