वाफ-व्हिटॅमिनच्या गोळय़ा टाळण्याचा सल्ला ः अनेक औषधे केली बंद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात थैमान घालत असलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचारांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. याअंतर्गत ‘अँटिपायरेटीक’ आणि ‘अँटिस्टीसिव’ वगळता इतर सर्व औषधे बंद करण्यास सांगितली आहेत. तसेच कोणतेही अँटीबायोटिक घेऊ नये असे सुचविण्यात आले असून वाफ घेऊ नये, व्हिटॅमिनची गोळी खाऊ नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लक्षणे नसलेल्या आणि हलकी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सुधारित नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार इड्रॉक्सीक्लोरोक्वीन, आइवरमेक्टिन, डॉक्सीसाइक्लिन, जिंक, मल्टिविटामिन आणि बाकी औषधे बंद करण्यात आली आहेत. आता त्यांना केवळ तापासाठी ‘अँटिपायरेटीक’ आणि सर्दीच्या लक्षणांसाठी ‘अँटिस्टीसिव’ दिले जाईल. कोरोना विषाणूची लक्षणे असलेल्या रुग्णाने ‘अँटिपायरेटीक’ आणि ‘अँटिस्टीसिव’ औषध घ्यायला हवे. खोकल्यासाठी ‘बुडसोनाईड’च्या 800 एमजी औषधाचा डोस दिवसातून दोनवेळा आणि पाच दिवसांपर्यंत घ्यावा, असे नव्या गाईडलाईनमध्ये सांगण्यात आले आहे.
नव्या नियमावलीमध्ये डॉक्टरांनी रुग्णांच्या अनावश्यक चाचण्या करू नयेत असे सुचविण्यात आले असून त्यामध्ये सिटीस्कॅन सारख्या चाचण्यांचा समावेश आहे. तसेच कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हात धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असेल तर त्याला फोन करून सल्ला घेण्याचा आणि पौष्टिक अन्न खाण्यास सांगितले आहे. कोरोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकमेकांशी फोनच्या माध्यमातून संपर्कात राहावे आणि सकारात्मक चर्चा करण्यास देखील सांगितले आहे. ज्या रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत त्यांच्यासाठी कोणतेही औषध सांगण्यात आलेले नाही. मात्र त्यांना इतर कोणताही आजार नसावा अशी अट आहे. तसेच हलकी लक्षणे, ताप, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा ऑक्सिजन पातळी तपासण्यास सांगितले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांसाठी दिलासा देणारी प्लाझ्मा थेरपी केंद्र सरकारने कोविड ट्रिटमेंट प्रोटोकॉलमधून हटविली होती. आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. दररोज नव्याने आढळणाऱया रुग्णांमध्ये देखील घट होत आहे. यापूर्वी 4 लाखांवर असलेली संख्या आता 1 लाखावर आली आहे त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणा पुरेपूर प्रयत्न करीत आहे.