बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जादा शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात आली आहे. रुग्णालयाने जास्त पैसे आकारल्याच्या तक्रारीवरून पूर्व विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांनी बुधवारी सी.व्ही. रमण नगर येथील खासगी रुग्णालयावर छापा टाकला आणि कायदेशीर कारवाई केली. दरम्यान, अतिरिक्त पोलिस महासंचालक (केएसआरपी) आलोक कुमार आणि राज्य सरकारचे सचिव मेजर मनिव्हानन यांच्यासह नोडल अधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयात छापा टाकत कारवाई केली.
दरम्यान, रूग्णालयाकडून रूग्णांना पुरविल्या जाणाऱ्या ऑक्सिजनच्या प्रत्येक तासासाठी एक हजार रुपये आकारले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच आयसीयू वॉर्डमध्ये रूग्णालयाने रुग्णांकडून दिवसाला ३० हजार रुपये आकारले तर बिलाच्या प्रतिमध्ये असे दिसून आले की १५ हजार रुपये शुल्क आकारले आहे. तर काही रूग्णांनी असे सांगितले की रुग्णालयाने अधिक पैसे घेऊन अनावश्यक रक्त चाचण्या केल्या.
एडीजीपी आलोक कुमार म्हणाले, “कोरोना रुग्णांकडून जास्त शुल्क घेतले जाऊ शकत नाही. आम्ही सीव्ही रमण नगर येथील खासगी रुग्णालयाकडून आयसीयू बेड्स आणि ऑक्सिजनसाठी अतिरिक्त शुल्क आकारल्याप्रकरणी रुग्णालयावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. ” तसेच रुग्णालयाने रूग्णांकडून जास्त पैसे घेतल्याची उदाहरणे शोधून काढली आणि रुग्णालय व्यवस्थापनाला पैसे परत करण्याचे निर्देश दिले. “त्यांनी आमच्या निर्देशांचे पालन करण्यात अपयशी ठरल्यास पुढील कार्यवाही केली जाईल,” असे कुमार एडीजीपी आलोक म्हणाले.