नवी दिल्ली /प्रतिनिधी
कोरोनानं संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. प्रत्येक देश कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोनाची दुसरी लाट अद्याप कमी झालेली नाही. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांनी करोना लसीकरणावर भर दिला आहे. दरम्यान, अनेक देशांनी कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना संपला नाही, त्याचा वेगही कमी झालेला नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं आहे. त्यामुळे यापुढे काळजी घेणं गरजेचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मागच्या दोन आठवड्यात आफ्रिकेतील मृत्यूदर ३०-४० टक्क्यांनी वाढला आहे. “मागच्या २४ तासात ५ लाख नविन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ९,३०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही काय कोरोना कमी होण्याची लक्षणं नाहीत”, असं सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं. डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक घातक विषाणू आहे. या व्हायरसची लागण झालेला व्यक्ती ८ जणांना संक्रमित करतो. तेच प्रमाण कोरोनाच्या इतर व्हायरसमध्ये ३ इतकं आहे. त्यामुळे डेल्टा व्हायरस किती घातक आहे? याचा अंदाज येतो, असंही त्यांनी सांगितलं.