पुसेगाव / वार्ताहर :
खातगुण गावच्या हद्दीत पुसेगाव जाखणगाव रस्त्यावर अवैद्यरित्या वाळू उपसा व वाहतूक केल्याप्रकरणी पुसेगाव पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून, ६ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोरोना काळात प्रत्येक माणसांला जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. महसूल, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन ‘ब्रेक द चेन’ कामात व्यस्त असताना वाळू माफियानी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. येरळा नदीपात्रात पुसेगाव ते नेर तसेच पुसेगाव ते काटकरवाडी दरम्यान रात्रभर वाळू उपसा होत असल्याची नागरिकांच्यात चर्चा आहे. सध्या तर रात्री बरोबरच भर दुपारीही वाळू तस्करी सुरू आहे. खातगुण हद्दीत पुसेगाव जाखणगाव रस्त्यावर दोन ट्रॅक्टर अवैद्य रित्या वाळू उपसा व वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी तातडीने पोलीस हवालदार घाडगे,भोसले, मुल्ला, मंगेश डोंबे यांच्यामार्फत सापळा लावून सुमारे ६ लाख ८८ हजार रुपयेचा माल जप्त करून खातगुण येथील दोघां लावंड बंधूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.