खासगी रुग्णालयांना सरकारचा आदेश
बेंगळूर : ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, अशा व्यक्ती अन्य विकारांवर उपचार करून घेण्यासाठी खासगी रुग्णालयात आल्यास त्यांच्यावर कोरोना चाचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र आणण्याचे बंधन घालू नये, असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. तशी काही प्रकरणे आढळल्याने हा आदेश देण्यात आला आहे. खासगी रुग्णालयात कोरोना सोडून इतर कारणास्तव उपचार घेण्यासाठी रुग्ण आल्यास त्याच्यावर उपचार करावेत. त्याला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्यास दाखल करून घ्यावे. कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र दाखविण्याचे बंधन नको. उपचार सुरू असताना आवश्यकता भासल्यास अशा व्यक्तीची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आदेशात स्पष्ट केले आहे. कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्राचे बंधन घातल्यास अशा व्यक्तींवर उपचार करण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीची हानी होऊ शकते. तसेच, ज्या प्रयोगशाळांना कोरोना चाचणी करण्याची अनुमती देण्यात आली आहे, त्यांनी ज्येष्ठ नागरीक आणि गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र रांग लावण्याची व्यवस्था करावी. त्यांना सर्वसामान्यांच्या रांगेत तिष्ठत ठेवू नये. तसेच रांगेतील प्रत्येकाला शारिरीक अंतर राखता येईल अशी सोय करावी. यासाठी एक आड एक खुर्च्यांची योजना करावी. चाचणी करून घेणाऱयांना मास्कचा उपयोग बंधनकारक करावा, तसेच हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी, असाही महत्त्वाचा आदेश राज्य सरकारने शुक्रवारी काढला आहे.