प्रतिनिधी / बेळगाव :
कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज झपाटय़ाने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाबद्दलची धास्ती अधिकाधिक वाढत आहे. परंतु या काळातही जागृती करण्यासाठी एक युवक सायकलवरून फिरत आहे. नागपूरचा हा युवक वाटेत भेटणाऱयांना आपण सुरक्षितता बाळगली तर कोरोनाची धास्ती होणार नाही, असा संदेश देत आहे.
नागपूरच्या कारोल भागातील विशाल मनोज टेकाडे हा महाविद्यालयीन विद्यार्थी 13 जूनपासून भारत भ्रमंतीला निघाला आहे. जीवनाचा अर्थ समजून घेताना हा युवक गावोगावी जावून तेथील संस्कृती व जीवनाची माहिती घेत आहे. काही ठिकाणी राहण्याची व्यवस्था होते. काही ठिकाणी स्मशानात त्याला दिवस काढावे लागतात. नागपूरपासून कोल्हापूर, सिंधुदुर्गमार्गे बेळगाव असा प्रवास करत हा युवक बेंगळूरला जाणार आहे. देशाच्या चारही टोकांना सायकलवरून प्रवास करण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
आयुष्यात आलेल्या मानसिक तणावामुळे तो व्यथित झाला होता. परंतु हे जग इतके सुंदर असून, आपण निसर्गामध्ये राहून त्याचा आस्वाद घेण्यासाठी तो भ्रमंती करत आहे. नागरिक देतील ते अन्न खात तो पुढील प्रवास करत आहे.