पंढरपूर / प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आता प्रतिदिन केवळ 1500 भाविकांना ऑनलाईन बुकिंग करूनच दर्शन मिळणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
कोरोनामुळे सात महिन्यांहून अधिक काळ विठ्ठलाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते.
त्यानंतर 16 नोव्हेंबर 2020 रोजी विठ्ठलाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. प्रारंभी भाविकांना दर्शनासाठी मर्यादा होती. मात्र कालांतराने सर्व मर्यादा शिथिल होत कोरोनाचे नियम पाळून मंदिर समितीकडून भाविकांना दर्शन दिले जात होते. मात्र सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता प्रतिदिन केवळ 1500 भाविकांनाच विठोबाचे ऑनलाईन बुकींग करून दर्शन मिळणार आहे.
गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून पंढरपूरात आधार कार्ड दाखवून सर्वसामान्य भाविकांना ऑनलाईन बुकींगविना दर्शन घेता येत होते. यामध्ये प्रारंभी प्रतिदिन आठ हजार भाविकांना दर्शन दिले जायचे. यानंतर गत महिन्यातील माघ वारी पासून प्रतिदिन केवळ तीन हजार भाविकांना दर्शन दिले जात होते. आता सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंदिर समितीने 3000 भाविकांच्या संख्येत देखील घट केली आहे.