सातारा / प्रतिनिधी :
सातारा तालुक्यातील माळ्याचीवाडी येथील असंघटीत कामगारांसाठी काम करणारे नंदकुमार केसकर यांनी गुरुवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याच्या नैराश्येतून केसकर यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की सातारा तालुक्यातील माळय़ाचीवाडीतील नंदकुमार केसकर हे व्यवसायाने प्लंबिंगचे काम करायचे. ते काम करता करता सामाजिक कार्य म्हणून जे असंघटीत कामगार आहेत. त्यांच्यासाठी कार्य करत होते. त्यांच्या नोंदी करुन त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी लढत होते. गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःची कोरोना टेस्ट केली. त्यात ते पॉझिटीव्ह आले. दरम्यान, नंतरची दुसरी टेस्ट निगेटीव्ह आली. मात्र, त्यानंतरही पुन्हा एका टेस्टमध्ये ते पॉझिटीव्ह आले. या नैराश्यातून त्यांनी गुरुवारी सकाळी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.