प्रशासनाकडून खबरदारी, आवश्यकता नसल्याने तीन किलोमीटरचा परिसर सील नाही
प्रतिनिधी/ चिपळूण
सात वर्षीय मुलगीसह आई-वडील कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने रविवारपासून कापरे गाव आयसोलेट करण्यात आले आहे. आवश्यकता नसल्याने 3 किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला नसून प्रशासनाने सर्व ती खबरदारी घेतली आहे. गावात जाणारी दोन प्रवेशद्वारे बंद करण्यात आली असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नव्याने येणाऱया चाकरमान्यांना 14 दिवस गावात प्रवेश दिला जाणार नसून त्यांना क्वारंटाईन रहावे लागणार आहे. रूग्णांवर कामथे रूग्णालयात उपचार सुरू असून 11 आरोग्य पथके गावात सर्व्हेक्षणाचे काम करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. विशेष करून हे सर्वजण चाकरमानी आहेत. यापूर्वी खांदाटपाली, तळसर व कळंबस्ते येथे प्रत्येकी एक असे 3 रूग्ण सापडले आहेत. त्यातील खांदाटपाली येथील रूग्ण बरा झाला असून त्याला घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत येथे 6 रूग्णांची नोंद झाली आहे. कापरे येथील हे कोरोनाबाधित कुटुंब 8 मे रोजी भांडूप-मुंबई येथून आले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने येथे खळबळ उडाली आहे. विशेष करून त्यांना कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आणखीनच भीती निर्माण झाली आहे.
तिघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. शनिवारपासून तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्यासह सर्व अधिकारी कापरे गावाकडे धाव घेत आहेत. यातूनच ग्रामपंचायत हद्दीपर्यंत आयसोलेट करण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर भाग तसा जंगली आहे, तर अन्य भागात आवश्यकता नसल्याने 3 किलोमीटरपर्यंतचा भाग सील न करण्याचे प्रशासनाने ठरवले. मात्र गावात जाणारी दोन प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे कोणालाही गावात जाता किंवा येता येणार नाही. येथे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिवस-रात्र 2 अधिकारी व 16 कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत.
गावात सर्व्हेशन सुरू
कापरे गावात 8 वाडय़ा असून 1204 इतकी लोकसंख्या आहे. त्यामुळे आरोग्य विभगाने कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा यांची 11 पथके तयार केली आहेत. या सर्व नियुक्त कर्मचाऱयांना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी रविवारी सकाळी प्रशिक्षण दिले. त्यानंतर गावात सर्व्हेशन करण्याचे काम सुरू करण्यात आले अहे. मात्र तपासणीसाठी कोणाचेही नमुने घेण्यात आलेले नाहीत.
तब्बल 124 चाकरमानी दाखल
गेल्या आठ दिवसांत या गावात तब्बल 124 चाकरमानी दाखल झाले आहेत. मात्र आता नव्या चाकरमान्यांना थेट गावात जाता येणार नसून त्यांना क्वारंटाईन केले जाणार आहे.
बाधित महिलेची प्रसती जून महिन्यात
तीन रूग्णांपैकी एक महिला गरोदर आहे. सध्या तिच्यासह तिचा पती व मुलीवर कामथे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेच्या प्रसुतीची तारीख 6 जून असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मात्र ही प्रसुती नजीकच्या काळात होईल, असे दिसून आल्यास तिला जिल्हा रूग्णालयात हलवण्याची शक्यता आहे.