जिल्हा रूग्णालयात 100 कर्मचाऱयांना लस देणार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना लसीचा शुभारंभ शनिवारी होणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून लसीकरणाबाबत सर्व खबरदारी व उपाययोजनांचे नियोजन केले आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता सर्व आरोग्य कर्मचाऱयांना बोलावण्यात आले असून सकाळी 9 वाजता लसीकरणाला प्रारंभ करण्यात येणार आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले असून एका सेंटरवर 100 या प्रमाणे 5 सेंटरवर 500 आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
जिल्हय़ात 16 हजार 330 लस दाखल झाल्या असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱयांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पोलीस दल वगैरे तर तिसऱया टप्प्यात उर्वरित लोकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्याचे नियोजन अगदी सुरळीतपणे करण्यात आले आहे. आयत्यावेळी कोणताही गोंधळ होवू नये या पध्दतीने हे नियोजन तयार करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात 5 सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.
यावेळी मधुमेह, उच्च रक्तदाब, इतर दुर्धर आजार तसेच गरोदर महिलांना लसीकरणातून वगळण्यात आले आहे. या बाबतच्या सर्व सूचना कर्मचाऱयांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणताही आजार नसणारे कर्मचारीच या मोहिमेला उपस्थित राहतील, असेही डॉ. फुले यांनी सांगितले.
दापोली कोरोना लसीकरणासाठी सज्ज
दापोलीः कोरोना महामारीवर प्रतिबंध करण्यासाठी निर्मिती झालेल्या कोव्हीशिल्ड या लसीचा डोस 16 जानेवारी रोजी दापोली उपजिल्हा रूग्णालयातील 100 आरोग्य कर्मचाऱयांना देण्यात येणार असल्याचे रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश भागवत यांनी सांगितले.
दापोलीसाठी 110 लसीचे डोस आले असून त्यातील दहा डोस बाजूला ठेवले जाणार आहेत. उपजिल्हा रूग्णालयातील 64 तर आसूद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील 36 आरोग्य कर्मचाऱयांना ही लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर अर्धा तास रूग्णालयात बसवून ठेवले जाणार असून त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. 24 तासांत काही झाल्यास त्यांना तातडीने उपजिल्हा रूग्णालयात दाखल होण्यास सूचनाही दिल्या जाणार आहेत. या कामासाठी 5 आरोग्यसेविका व सेवकांचे पथक तयार करण्यात आले असून 2 सेविका डोस देणार तर तिघेजण त्यांना मदत करणार आहेत. त्यातून एखाद्या कर्मचाऱयाची लस घेण्याची इच्छा न झाल्यास त्याला ही लस दिली जाणार नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. दापोली उपजिल्हा रूग्णालयातच या लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील अनेक कर्मचारी या लस घेण्यासाठी तयार असल्याचे समोर आले आहे. आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांना लस दिल्यानंतर पोलीस यंत्रणा, शासकीय कर्मचारी त्यानंतर इतर नागरिकांना ही लस दिली जाणार आहे, परंतु ही लस देताना प्रत्येकाच्या ओळखपत्राची तपासणी केली जाणार असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले.