सेन्सेक्स 635 अंकांनी घसरला, फार्मा निर्देशांक तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक स्तरावर चीनमध्ये पुन्हा कोरोनाची भीती पसरली असून याचे परिणाम भारतीय शेअरबाजारावर बुधवारी पाहायला मिळाले. दोन्ही निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले. फार्मा निर्देशांक मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे तेजीत असलेला पाहायला मिळाला.
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 635 अंकांच्या घसरणीसह 61,067 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 186 अंकांनी घसरत 18,199 अंकांवर बंद झाल्याचा पाहायला मिळाला. बुधवारी फार्मा निर्देशांक मात्र 2 टक्के इतका तेजीत होता. सोबत देताना आयटी निर्देशांकदेखील 0.7 टक्के तेजीत राहिला होता. दुसरीकडे सार्वजनिक बँकांचा निर्देशांक आणि धातू निर्देशांक 2 टक्के इतका घसरणीत राहिला होता. इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंटस् यांचे समभाग 2 टक्के इतके तर टाटा मोटर्स आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग 1 टक्का इतके घसरणीत होते. दुसरीकडे सन फार्मा, एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा, नेस्ले, इन्फोसिस आणि विप्रो यांचे समभाग तेजीसह कार्यरत होते. जागतिक स्तरावर कोरोनाचे रुग्ण वाढीला लागल्याने फार्मा उद्योगातील कंपन्यांच्या समभागांमध्ये बुधवारी तेजी पाहायला मिळाली. फार्मासह आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची खरेदी बुधवारी दिसून आली. लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल बीएसईवर 282.86 लाख कोटींनी कमी झाले होते. ऑटो आणि कंझ्युमर डय़ुरेबल कंपन्यांचे समभाग घसरणीत होते.
जागतिक बाजारांचा विचार करता अमेरिकेतील बाजार तेजीमध्ये होते. डो जोन्स 92 अंकांनी तर नॅसडॅक अल्पशा तेजीसह कार्यरत होता. युरोपियन बाजारही चांगल्या तेजीसह कार्यरत होता. आशियाई बाजारामध्ये मिश्र कल पाहायला मिळाला. यात हँगसेंग 65 अंक, सेट कंपोझिट तर जकार्ता कंपोझिट 52 अंकांनी तेजीत होता. निक्की त्याचप्रमाणे कोस्पी घसरणीत राहिला होता.