ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्यादृष्टिने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास आपण नक्की जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ऑटोक्लस्टर, चिंचवड येथील कोविड-19 रुग्णालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार चंद्रकांत पाटील, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे यांच्यासह आजी माजी महापौर, नगरसेवक आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने स्वतः खर्च करुन कोविड रुग्णालयाची उभारणी केल्याबाबत त्यांचे अभिनंदन करतो. पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. या नगरीत विविध जाती, धर्माचे नागरिक राहतात. लोकसंख्या जास्त असल्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांना कमी वेळेत, कमी खर्चात उपचार मिळाले पाहिजे, खाटांची कुठेही कमतरता पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांवर उपचारांती जादा देयक आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर प्रशासनाची करडी नजर आहे. याकरीता शहरासह ग्रामीण भागात पथके तयार करुन देयकाचे लेखा परीक्षण करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोना विरुध्दच्या लसीची भारतातील पहिली मानवी चाचणी सिरम इन्स्टिट्यूटच्यामदतीने भारती रुग्णालयात करण्यात आली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस निर्मिती करण्याचादृष्टिने संशोधन सुरु आहे, ही निश्चितच आशादायी बाब आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.