ऑनलाईन टीम / भोपाळ :
कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरुन रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका विद्यार्थ्याने रुग्णालयातून पळ काढल्याची घटना मध्य प्रदेशातील छतरपूरमधील नौगाव येथे घडली. पोलिसांनी या विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अभिषेक सिंह राजपूत असे या संशयित कोरोनाबाधित रुग्णाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक सिंह राजपूत हा मध्य प्रदेशातील छतरपूरमधील नौगावमधील रहिवासी आहे. तो चीनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. तो 14 जानेवारीला घरी परतला होता. त्याला सर्दी, ताप होता. तो कोरोना बाधित असल्याच्या संशयावरुन त्याला रुग्णालयातील स्वतंत्र वॉर्डमध्ये भरती करण्यात आले होते.
त्याच्या रक्ताचे नमुने पुण्यातील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र, रविवारी दुपारीच तो रुग्णालयातून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला पुन्हा रुग्णालयात भरती केले आहे.