नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवार, 4 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक आमंत्रित केली आहे. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता व्हर्च्युअल स्वरुपात ही बैठक होणार असल्याचे कळविण्यात आले आहे. केंद्र सरकारने बोलावलेली ही दुसरी बैठक आहे. यापूर्वी 20 एप्रिल रोजी ‘लॉकडाऊन’च्या काळात पहिली सर्वपक्षीय बैठक झाली होती. आता शुक्रवारच्या बैठकीला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित असतील. संसदीय कामकाज मंत्रालयाने बैठकीसंबंधी सभागृह नेत्यांशी संपर्क साधला आहे. या बैठकीत कोरोनावरील लस आणि आगामी हिवाळी अधिवेशनासंबंधी चर्चा होणार असल्याचे समजते.
भारतात आतापर्यंत 94 लाखांहून अधिक लोकांना कोरोना महामारीचा फटका बसला आहे. कोरोना रुग्णसंख्येच्या बातमीत भारत अमेरिकेनंतर दुसऱया क्रमांकावर आहे. दुसरीकडे सर्वात कमी मृत्यू झालेल्या देशांमध्ये भारताचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मार्च अखेरपासून भारतात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले होते. आता यापुढे लॉकडाऊन जाहीर केले जाणार नसले तरी केंद्र सरकारने जारी केलेल्या सावधगिरीच्या उपाययोजना पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच आता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लस आणण्याच्या पूर्वतयारीला वेग आला असून त्यासंबंधी सर्वपक्षीय बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
लस निर्मात्यांसमवेत पंतप्रधानांची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणाऱया तीन टीम्ससोबत चर्चा केली. लस विकसित करणाऱया पुण्यातील जीननोव्हा बायोफार्मासह हैदराबादमधील बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डीज लॅब यांच्या टीम्ससोबत पंतप्रधानांनी चर्चा करत औषधासंबंधी माहिती जाणून घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यात गुंतलेल्या वैद्यकीय तज्ञांसमवेत ही चर्चा करण्यात आली. पंतप्रधानांनी दोन दिवसांपूर्वीच अहमदाबादच्या झायडस पार्क, हैदराबादच्या भारत बायोटेक आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूटला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी आज केलेली चर्चाही महत्त्वाची मानली जात आहे.