क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील कोलकाता डर्बी एटीके मोहन बागानने जिंकली. फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात एटीके मोहन बागानने एससी ईस्ट बंगालचा 3-1 गोलानी पराभव केला. या विजयाने एटीकेने आपली पहिल्या स्थानावरील आघाडी मुंबई सिटी एफसीपेक्षा पाच गुणानी वाढविली, मात्र मुंबईचा संघ एटीके मोहन बागानपेक्षा एक सामना कमी खेळला आहे.
एटीके मोहन बागान संघासाठी रॉय कृष्णा, डेव्हीड विलियम्स आणि झेवियर हर्नांडिस यांनी गोल केले. पराभूत एससी ईस्ट बंगालच्या एकमेव गोलची नोंद सॅल्फ गोलद्वारे एटीकेच्या टिरी याच्याकडून झाली. या विजयाने एटीके मोहन बागानला तीन गुण प्राप्त झाले. त्यांचे आता 18 सामन्यांतून बारा विजय, तीन बरोबरी आणि तीन पराभवाने 39 गुण झाले असून ते पहिल्या स्थानावर आहेत. एससी ईस्ट बंगालचा हा 18 व्या सामन्यातील सातवा पराभव ठरला. तीन विजय आणि आठ बरोबरीने त्यांचे 17 गुण झाले व ते आता नवव्या स्थानावर आहेत.
गुणतक्त्यात आता हैदराबाद एफसी, एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचे 18 सामन्यांतून प्रत्येकी 27 गुण झाले असून ते अनुक्रमे तिसऱया, चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत. शुक्रवारी आरंभापासूनच एटीके मोहन बागानने लढतीवर वर्चस्व ठेवले. सामन्याच्या दुसऱयाच मिनिटाला मानवीर सिंगच्या पासवर डेव्हीड विलियम्सचा गोल करण्याचा यत्न ईस्ट बंगालचा गोलरक्षक सुब्रोतो पॉलने अडविला. लगेच रॉय कृष्णाच्या पासवर गोल करण्याचा मानवीर सिंगचाही प्रयत्न अगदी थोडक्यात हुकला.
सामन्याच्या 15 व्या मिनिटाला टिरीच्या पासवर रॉय कृष्णाने सुब्रतो पॉलला लिलया भेदले आणि चेंडू जाळीत सारला. या गोलनंतर एटीके मोहन बागानच्या मार्सेलिनो परेराचा फटका सुब्रतो पॉलने आपल्या डाव्या बाजूने झेपावत
अडविला.
23 व्या मिनिटाला ईस्ट बंगालने सेल्फ गोलवर बरोबरी साधली. ईस्ट बंगालच्या राजू गायकवाडचा थ्रो-ईन परतविण्याच्या यत्नात टिरीने घेतलेला हेडर सरळ एटीकेच्या गोलात गेल्याने बरोबरीचा गोल झाला.
दुसऱया सत्रात एटीके मोहन बागानने आणखी दोन गोल नोंदविले. मध्यंतरानंतर पाचच मिनिटानी एटीके मोहन बागानने केलेल्या आक्रमणावर कार्ल मॅकहय़ुजने दिलेल्या पासवर डेव्हीड विलियम्सचा फटका दिशाहीन ठरला.
72 व्या मिनिटाला डेव्हीड विलियम्सने रॉय कृष्णाच्या पासवर एटीकेचा दुसरा गोल करून संघाची आघाडी 2-1 गोलानी वाढविली. सामना संपण्यास चार मिनिटे शिल्लक असताना जॅकीस मघोमाच्या पासवर ब्राईट एनोबाखरेचा अगदी जवळून गोल करण्याचा यत्न एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यने तत्परतेने अडवून संघावर होणारा संभाव्य गोल टाळला. शेवटच्या क्षणी झेवियर हर्नांडिसने हेडरवर गोल नोंदवून एटीके मोहन बागानचा विजय साकार केला.