महापालिकेच्या भरारी पथकांची कारवाई : प्रत्येक एकहजार रूपयांचा दंड
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या नियमांचा भंग केल्याबद्दल महापालिकेच्या भरारी पथकाने शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत शहरातील चौदा दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. कारवाईत प्रत्येक एकहजार रूपयांचा दंड संबंधित दुकानदारांना करण्यात आला आहे. मास्क व सॅनिटायझर न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे आदी नियमांचे पालन या चौदा दुकानांत करण्यात आले नसल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर प्रत्येक एकहजार रूपये दंडाची कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्यात मद्यविक्रीच्या दुकानांसह सराफी दुकान, हॉटेल, रेस्टॉरन्ट, मेडिकल शॉप, साडी दुकान, मॉल आदींचा समावेश आहे. या सर्वांना पहिल्या नियमभंगाबद्दल दंडात्मक कारवाई बरोबर इशाराही देण्यात आला आहे. दुसऱयांदा नियमभंग झाल्यास मोठा दंड व काही काळ दुकान बंदची कारवाई होणार आहे, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
अशी आहे दंडाची तरतूद
कोरोनाच्या नियमांचा पहिल्यांदा भंग झाल्यास दुकानदार व इतर व्यवसाईक यांना एकहजार रूपये व मंगल कार्यालयांना दोनहजार रूपये दंडाची तरतूद आहे. दुसऱयांदा उल्लघंन केल्यास दंड आकारणी व दोन तासासाठी आस्थापना बंद, तिसऱयांदा उल्लंघन झाल्यास दंड आकारणी व 15 दिवसासाठी आस्थापना परवाना निलबंन व चौथ्यांदा उल्लंघन झाल्यास फौजदारी कारवाई व 1 महिन्याकरिता आस्थापना परवाना निलबंन करण्यात येणार आहे.