प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये भारत बायोटेकच्या कोरोनावरील लसीचे तिसऱया टप्प्यातील चाचणी लसीकरण सुरू आहे. सप्ताहभरात 200 जणांना ही लस देण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभरात 20 जणांना लस टोचली आहे. चाचणी लसिकरणाची मुदत सप्ताहभर वाढवली आहे. त्यामुळे स्वयंसेवकांनी संपर्क साधावा, असे आवाहन सीपीआरमधील टेस्टींग सेंटरने केले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआर हॉस्पिटल, क्रोम कंपनी आणि आयसीएमआर यांच्या प्रयत्नातून भारत बायोटेकच्या कोरोनावरील लसीची चाचणी सुरू आहे. तिसऱया टप्प्यातील या चाचणी लसिकरणाला गेल्या मंगळवारी, 22 रोजी सुरूवात झाली, पहिली लस 77 वर्षीय माजी सैनिकाला टोचण्यात आली. त्यानंतर लसिकरणासाठी हळूहळू स्वयंसेवकांचा प्रतिसाद वाढत आहे. नोंदणीसाठी सीपीआरमध्ये मंडपही घातला आहे. तेथे स्वयंसेवकांची नोंदणी सुरू आहे.
सीपीआरमधील जुन्या इमारतीत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर स्वयंसेवकांना लस दिली जात आहे. मंगळवारी 20 जणांना ही लस टोचण्यात आली. सप्ताहभरात 200 स्वयंसेवकांना ही लस टोचण्यात आल्याची माहिती परेश पाटील यांनी दिली. दरम्यान, 31 डिसेंबरपर्यत 1 हजार स्वयंसेवकांना प्रायोगिक लसिकरणाचे उद्दिष्ट होते. पण सप्ताहभरातील प्रतिसाद अन् इंटरनेंटमधील अडथळÎांमुळे त्यांची गती संथ आहे. त्यामुळे स्वयंसेवकांना नोंदणी अन् लसिकरणासाठी सप्ताहभर मुदतवाढ देण्यात आली आहे.
सीपीआरमधील या प्रायोगिक केंद्राला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांनी भेट दिली. त्यांनी सुरू असलेल्या लसिकरणाची माहिती घेऊन नोंदणी वाढवण्याची सुचना केली. यावेळी डॉ. गिरीश कांबळे उपस्थित होते.