खासदार संभाजीराजे यांची माहिती: जागा निश्चितीसह निविदा प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर शहर आणि जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दररोज कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढणारी संख्या, कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱयांचा वाढणारा आकडा यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरला कोविड सेंटर उभारणीसाठी राज्य शासनाने तब्बल साठ कोटी रूपये मंजूर केले आहेत. ही माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. राज्यशासनाने निधी मंजूर केल्यानंतर आता कोविड सेंटरसाठी जागा निश्चित करून तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करा, अशा सूचना आपण जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिल्या असल्याचेही खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यात कोल्हापूरमधील कोरोनाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. वेळेत उपचार न मिळणे, ऑक्सिजन, व्हेटिंलेटर न मिळणे, ऑक्सिजन बेड न मिळणे यामुळे अनेक रूग्णांचे बळी जात आहेत. अशा स्थितीत सध्या वैद्यकीय सेवा आणि सुविधा, साधने वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे नेते, आजी माजी खासदार, आमदार यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यशासनाकडे कोविड सेंटरसाठी निधी देण्याची मागणी केली होती. खासदार संभाजीराजे यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विशेष निवेदन सादर करून निधीची मागणी केली होती. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना कोल्हापुरातील स्थितीची माहिती देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषयक आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी संवाद साधून माहिती घेतली. त्यावेळी सौरभ राव यांनी कोल्हापूरसाठी 60 कोटींचा निधी निधी राज्य शासनाने मंजूर केल्याची माहिती खासदार संभाजीराजेंना दिली. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर चार ते पाच दिवसांत हा निधी वर्ग होईल. त्यामुळे कोविड सेंटरसाठी जागा निश्चित करून काम सुरू करा, निविदा प्रक्रिया सुरू करा, अशा सूचना संभाजीराजे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना केल्या. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.
निधीसाठी राजकीय नेत्यांची एकजूट
कोविड सेंटरसाठी निधी मिळावा यासाठी जिल्हय़ातील राजकीय नेते, आजी माजी आमदार, खासदार यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांना, अर्थमंत्र्यांना निवेदन सादर केली होती. खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशिल माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते माजी खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सर्वश्री पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, विनय कोरे, प्रकाश आबीटरकर, राजेश पाटील, चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, राजूबाब आवळे, माजी आमदार चंद्रदीप नरके आदींनी मागणी केली होती. राज्य मंत्रिमंडळात असणाऱया गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही शासन दरबारी आपली शक्ती पणाला लावत निधीसाठी पाठपुरावा केला होता. या सर्वांच्या एकजुटीच्या प्रयत्नांना यश आले असून कोरोनाला सामोरे जाताना एकजुटीचे दर्शन घडले आहे.
कोल्हापूरसह सांगली, सोलापूर, आणि सातारा जिह्यांची कोविड सेंटरविषयक जी मागणी होती ती सुद्धा राज्य शासनाने मंजूर केली आहे. संबंधित जिल्हय़ांच्या जिल्हाधिकाऱयांना निविदेची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर 4 ते 5 दिवसात निधी वर्ग होईल. -खासदार संभाजीराजे छत्रपती