पाचगावमध्ये कोरोना पॉझिटिव्हची एकूण संख्या ३५९ वर
वार्ताहर / पाचगाव
आर. के. नगर रुमाले माळ येथील एकाच कुटुंबातील २४ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या सर्वांवर घरीच उपचार सुरू आहेत.
पाचगाव, आर. के. नगर परिसरात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. आर. के. नगर रूमाले माळ येथे ३ भाऊ व त्यांचे कुटुंबिय राहतात या कुटुंबात एकूण २९ व्यक्ती आहेत. त्यापैकी २४ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर पाच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्या सर्वांवर घरीच उपचार सुरू आहेत.
पाचगावमध्ये रविवारपर्यंत एकूण ३५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २४२ रुग्ण बरे झाले आहेत. तर सतरा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पाचगाव परिसरात ‘घर टू घर’ नागरिकांची तपासणी सुरू आहे. या सर्वेक्षणामध्ये एकूण २८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी ग्रामस्थांनी सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करावे व मास्कचा वापर करावा असे आवाहन केले आहे.