कधीही खाकी वर्दीवर न दिसणारे मंगळवारी वर्दीवर
पोलीस अधिकारी व कर्मचार्यांमध्ये धावपळ
प्रतिनिधी / इचलकरंजी
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी इचलकरंजी शहरातील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयासह शहरातील पोलीस ठाणे, शिरोळ तालुक्यातील कुरूंदवाड आणि शिरोळ या पोलीस ठाण्यांना मंगळवारी सकाळी अचानक भेटी दिल्या. पोलीस ठाण्यातंर्गत विविध समस्या व घटनांची माहिती घेतली. पोलीस अधीक्षकांच्या अचानक दौऱ्याच्या धास्तीने कधीही खार्दी वर्दीवर दिसत नसलेले पोलीस कर्मचारी मात्र, मंगळवारी दिवसभर वर्दीवर दिसून येत होते.
जिल्ह्यात नव्याने पोलीस अधीक्षक म्हणून काही दिवसांपूर्वी रुजू झालेले शैलेश बलकवडे यांनी मंगळवारी सकाळी पोलीस मुख्यालयातून थेट कुरूंदवाड पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर त्यांनी शिरोळ पोलीस ठाण्याला भेट देवून सरळ आपली गाडी इचलकरंजी शहराकडे वळविली. थेट शहरातील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यानंतर पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी या कार्यालयामधील कामकाजाची माहिती घेतली. त्यानंतर शहरातील पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. प्रभारी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांबरोबर संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या.