17 एप्रिल रोजी मतमोजणी; राजकीय हालचालींना वेग
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्ह्य़ाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून 17 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 17 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. दरम्यान, पोटनिवडणुकीच्या घोषणेनंतर राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. महाविकास आघाडी, भाजपच्या संभाव्य उमेदवारांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांशी संपर्क सुरू केला असून आपसह इतर पक्षही रिंगणात उतरण्यासंदर्भात अंदाज घेत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी कोल्हापूरसह देशातील पाच विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांचे 2 डिसेंबर 2021 रोजी निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या पोटनिवडणूकीकडे कोल्हापूर जिल्हय़ाचे लक्ष लागून राहिले होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील दोन, छत्तीसगडमधील एक, बिहारमधील एक आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. 17 मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 24 मार्च पर्यंत मुदत आहे. 25 मार्च रोजी उमेदवारी अर्ज छाननी आणि 28 मार्च रोजी निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे. 12 एप्रिल रोजी मतदान आणि 16 एप्रिल रोजी मतमोजणी असा कार्यक्रम आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
-गॅझेट जाहीर करण्याची तारीख 17 मार्च
-उमेदवारी अर्ज दाखल अंतिम तारीख 24 मार्च
-उमेदवारी अर्ज छाननी तारीख 25 मार्च
-उमेदवारी अर्ज माघारीची तारीख 28 मार्च
-मतदान तारीख 12 एप्रिल
-मतमोजणी, निकाल 16 एप्रिल
आचारसंहिता लागू
केंद्रीय निवडणूक आयोगाने कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने शनिवारपासून शहरात आचारसंहिता लागू झाली आहे.
महाविकास आघाडी विरुध्द भाजप सामना?
कोल्हापूर उत्तर विधानसभेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न मागे पडला आहे. यामुळे निवडणूक होणार हे निश्चित असून सद्या तरी महाविकास आघाडी विरुध्द भाजप असाच सामना होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपकडून सत्यजित कदम यांच्या नावाची चर्चा आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेनेही दावा केला आहे. शिवसेना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासाठी आग्रही आहे. स्थानिक शिवसेना नेत्यांनी पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवडणूक लढविण्यासाठी परवानगी मागितली आहे. मैत्रीपूर्ण निवडणूक लढविण्याचा प्रस्तावही शिवसेनेने पुढे आणला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे कोणता निर्णय घेतात, यावर स्थानिक शिवसेनेची भूमिका ठरणार आहे. त्याबद्दल शिवसैनिकातही उत्सुकता आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने घवघवीत यश मिळवत सत्ता संपादन केल्याने कोल्हापूरात या पक्षाच्या आशा दुणावल्या आहेत. यामुळे ‘आप’ ही निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.