जिल्ह्यातील 60 हून अधिक खासगी हॉस्पिटल्समधील चित्र, मल्टीस्पेशालिटी मोठ्या हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन टँकची सुविधा
कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये गर्दी वाढली आहे. सुमारे 60 हॉस्पिटल, खासगी केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रायव्हेट हॉस्पिटल्सना ऑक्सिजनसाठी धावाधाव करावी लागत असून, ऑक्सिजनसाठी रुग्ण स्थलांतराची वेळ प्रायव्हेट हॉस्पिटल्सवर आली आहे. त्यामुळे सीपीआरने अतिगंभीर रुग्णांना सीपीआरकडे पाठवू नका, अशा सूचना केल्या आहेत.
जिल्ह्यात निवडक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये त्यांचे स्वतःचे ऑक्सिजन टँक आहेत. त्यांना टँकरद्वारे लिक्विड ऑक्सिजन पुरवला जातो. त्यामुळे मोठ्या हॉस्पिटल्सना ऑक्सिजनचा तुटवडा फारसा भासलेला नाही. पण शंभरपेक्षा कमी रुग्ण असलेली जिल्ह्यात 50 हून अधिक खासगी हॉस्पिटल्स, केअर सेंटर आहेत.
जिल्ह्यात बाधितांपैकी 22 टक्के रूग्ण अतिगंभीर असून ते ऑक्सिजनवर आहेत. जिल्ह्यात 10 हजार 500 बेड या रुग्णांसाठी आहेत. सक्रिय रूग्ण 13 हजारांवर आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटर बेडसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सप्ताहभरात कोरोनाने 380 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये काहींना वेळेत ऑक्सिजन, व्हेटिलेटर न मिळाल्याने मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.
सप्ताहभरापूर्वी 2927 रूग्ण ऑक्सिजन बेडवर होते. गुरुवारी ही संख्या 3 हजारांवर पोहोचली. कोरोना रूग्णांवर उपचार करणारी 54 खासगी हॉस्पिटल्स आहेत. तेथील रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करावा लागतो आहे. जम्बो आणि मिनी सिलिंडर त्यांना पुरवली जात आहेत. स्थानिक स्तरावरून हा ऑक्सिजन मिळत असला तरी सिलिंडरसाठी प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या प्रशासनांना धावाधाव करावी लागत आहे. रुग्ण अतिगंभीर झाल्यास ऍम्ब्युलन्सद्वारे तो अन्यत्र स्थलांतर करण्याची वेळ प्रायव्हेट हॉस्पिटल्सवर आली आहे.
…त्यामुळे मृत्युदर वाढतो आहे !
रुग्णांना किती तीव्रतेने ऑक्सिजन दिला जातो, त्याच्यावर सगळे अवलंबून आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटल्स ऑक्सिजन जपून वापरत आहेत. तरीही एखादा अतिगंभीर रुग्ण तो थेट सीपीआरकडे पाठवला जात आहे. पण टास्क फोर्सच्या बैठकीत प्रायव्हेट हॉस्पिटल्सकडून उशिरा रूग्ण रेफर होत असल्याने मृत्युदर वाढत असल्याचे समोर आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी अतिगंभीर रुग्णांना सीपीआरकडे पाठवू नका, अशा सूचना प्रायव्हेट हॉस्पिटल्सना दिल्या आहेत.