मोकाबंदींच्या झडतीवेळी प्रकार उघडकीस
प्रतिनिधी / कोल्हापूर
कळंबा कारागृहातील मोकाबंदीच्या अंगझडतीदरम्यान सिमकार्ड आढळले. या प्रकरणी स्वप्नील मोहन काकडे या मोकाबंदीवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद कारागृह शिपाई समाधान बाबुराव हत्तीकर (वय 31 रा. इचलकरंजी) यांनी दिली. या प्रकारामुळे कारागृह प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे.
याबाबतची माहिती अशी, सातारा येथील मोकातील संशयीत आरोपी स्वप्नील काकडे हा कळंबा कारागृहामध्ये आहे. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्याला सातारा येथील मोका न्यायालयात हजर करण्यासाठी नेणार होते. त्याला कारागृहातील ड्रेस बदलून दुसरा ड्रेस परिधान करण्यासाठी कपडा गोडावूनमध्ये नेण्यात आले. ड्रेस बदलून स्वप्नील कारागृहाच्या मेन गेटवर आला. या ठिकाणी कारागृह शिपाई समाधान हत्तीकर अंगझडती अंमलदार म्हणून नेमणूकीस होते. त्यांनी स्वप्नीलची अंगझडती घेतली असता त्याच्या जीन पँटच्या खिशामध्ये पिवळ्या रंगाचे सिमकार्ड आढळून आले. हत्तीकर यांनी याची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱयांना दिली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
वारंवार घटना, तपास होणे गरजेचे कारागृहात डिसेंबर महिन्यात मोबाईल फेकण्याच्या प्रकारानंतर प्रशासन सतर्क झाले होते. वारंवार झडती घेण्यात येत आहे. तरीही कारागृहात मोबाईल, सिमकार्ड सापडण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे येथे नेमके मोबाईल, सिमकार्ड आहेत किती, ते किती दिवसापासून आत आहेत. याचा तपास होणे गरजेचे आहे. |