कोल्हापूरवासीयांना दिलासा : शेंडा पार्कसह खासगी हॉस्पिटलमध्ये नियोजन
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरासह जिल्हय़ामध्ये कोराना संसर्गाची व्याप्ती आणि रुग्णसंख्याही चांगलीच वाढली आहे. कोरोना रुग्णांसह सर्वसामान्य नागरिकांनाही उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असलेला बेड मिळत नसल्याचे प्रकार घडत आहेत. रुग्णांना परत पाठविले जात आहेत. उपचारांअभावी रस्त्यातच रुग्णांचे जीव जात आहेत. सद्यस्थितीत ज्वलंत असणार्या या परिस्थितीवर जिल्हा प्रशासनानेकडून कोरोनासाठी नवीन 400 बेडचे नियोजन करण्यात आले आहे. शेंडा पार्क येथील ग्रंथालयाच्या इमारतीत 200 बेड व शहरातील खासगी रुग्णालयात उर्वरित 200 बेड दिले जाणार आहेत. लवकरच आदेश काढून याची अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले आहे.
कोरोना रुग्णांसह सर्वसामान्य माणसालाही शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असलेला बेड मिळेल का नाही ? याची चिंता सतावत आहे. गत महिन्याभरात वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. शहरातील रुग्णालयात धडक मारुनही बेड शिल्लक नाही असे सांगून रुग्णांना परत पाठविण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून शासन आणि जिल्हा प्रशासनाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांही रस्त्यावर उतरून आवाज उठवत आहेत. या दबावावर प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या जात असल्याचे दिसत आहे.
लवकरच आदेश काढून अंमलबजावणी : दौलत देसाई, जिल्हाधिकारी
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आणखी नवीन 400 बेडचे नियोजन करण्यात आले आहे. शेंडा पार्क येथील ग्रंथालय इमारत येथे 200 तर उर्वरित 200 बेड ची व्यवस्था शहरातील खासगी रुग्णालयात केली जाणार आहे. याबाबतचे आदेश काढून ते लागू केले जातील.
सद्यस्थितीला सर्वात ज्वलंत विषय
रुग्णालयांमधील बेडची अपुरी संख्या वाढविण्याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले आहे. ऑक्सिजनसह इतर आवश्यक वैद्यकीय सुविधा असणाऱया 400 नवीन बेडचे नियोजन करण्यात आले आहे. यातील 200 बेडची व्यवस्था शेंडा पार्क येथील ग्रंथालय इमारत येथे तर उर्वरित 200 बेडची व्यवस्था शहरातील खासगी रुग्णालयात होत आहे. हे चित्र नक्कीच कोल्हापूरकरांसाठी आशादायी आहे.