संशयित आरोपींना वाचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप
प्रतिनिधी / कोल्हापूर
घरफाळा घोटाळा प्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत झाली आहे. या यंत्रणेला महापालिकेतील काही अधिकारी व विभाग मदत करत आहेत. कोणतीही माहिती मागितली तर ती दिली जात नाही, यामागे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. करनिर्धारक आणि संग्राहक संजय भोसले यांच्यावर नगरसेवक भूपाल शेटे यांनी केलेल्या आरोपांची तातडीने शहनिशा करा. त्यांचा घोटाळय़ाशी संबंध आहे की नाही हे जाहीर करा, अन्यथा न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
घरफाळा घोटाळा प्रकरणी शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात महत्वपूर्ण बैठक झाली. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत नगरसेवक प्रा. जयंत पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा पार्टे, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई, कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदूलकर उपस्थित होते. विविध प्रश्नांवरून या बैठकीत खडाजंगी झाली. गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्नांची सरबत्तीही केली.
आरोपींना वाचविण्यासाठी षडयंत्र
नगरसेवक प्रा. जयंत पाटील म्हणाले, घरफाळा घोटाळय़ात संशयित आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर सुनावणीत मी प्रतिवादी झालो हेतो. त्यामुळे घरफाळा विभागाशी संबंधित माहिती महापालिकेकडे मागूनही दिली जात नव्हती. आरोपींना वाचविण्याचा काही जण षडयंत्र करत आहेत. यंत्रणा कार्यरत झाली आहे. ही बाब गंभीर असून आयुक्तांनी दखल घ्यावी. घरफाळा घोटाळय़ातील चौदा प्रकरणांची चौकशी करा. संजय भोसले यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची महापालिका प्रशासनाने तातडीने शहनिशा करावी. त्यांचा संबंध असेल तर ती बाब न्यायालयातील दाव्यात घातक ठरू शकते. संशयित आरोपी फिर्यादीवरच आरोप असल्याचा युक्तीवाद करू शकतात. त्यामुळे संजय भोसलेंवरील आरोपांबाबत तातडीने स्पष्टीकरण देण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली.
घरफाळा विभागाचे 2014 नंतर ऑडिट का केले नाही?
घरफाळा विभागाचे 2014 नंतर ऑडिट का करण्यात आले नाही? असा गंभीर प्रश्न उपस्थित करत बाबा इंदूलकर म्हणाले, चौकशी समितीने 14 प्रकरणात घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. अधिकाऱयांनी पदाचा गैरवापर करत संघटितपणे संगनमताने गुन्हा केला आहे. सहभागी अधिकारी, कर्मचाऱयांची जबाबदारी निश्चित करा, महापालिका बंद असताना पहाटे घरफाळय़ाच्या रकमा कमी केल्या जातात. सर्व बदल ऑनलाईनच्या माध्यमातून झाले आहे. यामध्ये सहभागी अधिकारी, कर्मचाऱयांबरोबर ज्यांचे घरफाळे कमी करण्यात आले, त्यांनाही आरोपी करावे, अशी मागणीही इंदूलकर यांनी केली. आयुक्तांच्या वतीने उपायुक्तांनी गुन्हे दाखल करणे आवश्यक होते, पण त्यांनी ती जबाबदारी संजय भोसलेंवर दिली, याकडे इंदूलकर यांनी लक्ष वेधले. इतर प्रकरणात उपायुक्तांनी दाखल करावेत, अशी मागणीही केली. यावेळी उपायुक्त आणि इंदूलकर यांच्यात शाब्दिक खंडाजंगी झाली.
महापालिकेच्या पॅनेलवरील वकील कुठे आहेत?
दिलीप देसाई म्हणाले, घरफाळा प्रकरणी आरोपींच्या अटकपूर्व जामिनी अर्जावरील सुनावणीवेळी महापालिकेच्या पॅनेलवरील एकही वकील, जबाबदार एकही अधिकारी हजर राहत नव्हता. ही अत्यंत गंभीर बाब आहे. पॅनेलवरील वकील नेमके काय करतात? हा प्रश्न आहे. या प्रकरणात महापालिकेचे सभागृह आणि स्थायी समिती यांचीही जबाबदारी आहे. ती निश्चित झाली पाहिजे, अशी मागणीही देसाई यांनी केली.
मंगळवारपर्यंत सर्व माहिती देणार ः आयुक्त
बैठकीत शेवटी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मंगळवार पर्यंत सर्व चौकशी करून संजय भोसले यांच्यासह इतर गोष्टींची माहिती देण्याची ग्वाही दिली.
फिर्यादीत भ्रष्टाचार, गैरव्यवहाराचा उल्लेख नाही
घरफाळा घोटाळय़ात चार जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पण गुन्हा दाखल करताना फिर्यादीत भ्रष्टाचार, गैरव्यवहार झाल्याचा उल्लेख करण्यात आला नसल्याचा आरोप या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला.