-केंद्र सरकारच्या निधीसह जम्बो हॉस्पिटल, खासगी हॉस्पिटलवरील कारवाईबाबत विचारणा
-कोरोना आढावा बैठकीत अधिकारी निरुत्तर
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोनासाठी जम्बो हॉस्पिटलच्या प्रस्तावाचे काय झाले. ई.एस.आय.ची इमारत कोरोना उपचारासाठी का ताब्यात घेतली नाही. जिल्हयात रुग्णसंख्या व मृत्यूसंख्या रोखण्यासाठी काय उपाययोजना सुरु आहेत. अशा विविध प्रश्नांची सरबत्ती करत खासदार संभाजीराजे यांनी जिल्हाप्रशासनाला धारेवर धरले.
जिल्हयातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठीकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी. पाटील आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रशासनाकडून गांभीर्याने व गतीने ज्या उपाययोजना करायला पाहिजेत ते होत नसल्याचे दिसत आहे. परिस्थिती गंभीर झाली असताना जम्बो हॉस्पिटलचे नियोजन अगोदरच का केले नाही अशी विचारणा खासदार संभाजीराजे यांनी केली. यावर उपस्थित अधिकाऱ्यांना नीट उत्तरे देता आली नाहीत. ई.एस.आय. ची इमारत कोरोना उपचारासाठी उपलब्ध होऊ शकते, असे असताना ती ताब्यात देण्यासाठी सहकार्य न करणाऱ्या ई.एस.आय.च्या अधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी संभाजीराजेनी काढली.