प्रतिनिधी / कोल्हापूर
जि.प.कडील वरिष्ठ सहाय्यक पदावरून अधिक्षक या पदावर पदोन्नती देण्यासाठी 28 जून रोजी प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर यादीमध्ये अनुक्रमांक 4 वर नाव नमूद असलेल्या वरिष्ठ सहाय्यकांनी कोल्हापूर येथील औद्योगिक न्यायलयात दावा दाखल करून प्रतिक्षा यादी तसेच अधिक्षक पदावर देण्यात येणाऱ्या पदोन्नती प्रक्रियेस स्थगिती घेतली आहे. पण ही स्थगिती उठवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विधी सल्लागारांनी कायदेशीर म्हणणे न्यायालयात मांडले नसल्याचा आरोप जि.प.सदस्य विजय भोजे यांनी पत्राद्वारे केला आहे.
7 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीचे निकष पूर्ण केलेल्या वरिष्ठ सहाय्यक संवर्गातील 13 कर्मचाऱयांची अधिक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पण याच प्रतिक्षा यादीमध्ये नाव नोंद असलेल्या एक वरिष्ठ सहायकांनी या यादीवर आक्षेप घेत औद्योगिक न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे. त्यानुसार न्यायालयाने पदोन्नतीच्या यादीची अंमलबाजावणी करण्यासाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे वरिष्ठ सहाय्यक पदावरून अधिक्षक पदोन्नतीस पात्र असलेल्या इतर कर्मचाऱयांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा सदस्य विजय भोजे यांनी सीईओंना दिलेल्या पत्रामध्ये स्पष्ट केला आहे.
ही स्थगिती उठवण्यासाठी जि.प.तील संबंधित कायदे सल्लागारांनी न्यायालयात कायदेशीर म्हणणे सादर केलेले नाही. परिणामी स्थगिती उठली नसल्यामुळे यादीतील इतर कर्मचाऱयांवर अन्याय होत आहे. त्यामुळे 17 सप्टेबर रोजी होणाऱया सुनावणीमध्ये जि.प.प्रशासनाकडून म्हणणे सादर करून स्थगिती उठवण्याबाबत विधी सल्लागारांना सूचना द्याव्यात अशी मागणी सदस्य विजय भोजे यांनी केली आहे.