गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्क मिळण्यासाठी 15 जानेवारीपर्यत मुदत, सहकार विभागाचा उपक्रम
प्रतिनिधी / कोल्हापूर
गृहनिर्माण संस्थांना जमिनीचा मालकी हक्क मिळण्यासाठी नववर्षांच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारी जिल्हÎात अभिहस्तांतरण विशेष मोहिमेला सुरूवात झाली. आहे. ही मोहीम 15 जानेवारीपर्यत सुरू राहणार आहे. या मोहिमेतून विकसकांकडे असलेला मालकी हक्क गृहनिर्माण संस्थांना मिळणार आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापनेनंतर 4 महिन्यांत विकसकाने इमारतीसाठी वापरलेल्या जमिनीचा ताबा गृहनिर्माण संस्थेला हस्तांतरण करणे बंधनकारक आहे. गृहनिर्माण संस्थेच्या नावे जमिनीची मालकी नोंद होईपर्यत वाढीव एफएसआय, इमारत पुनर्बांधणीसाठी संस्थेला विकसकावर अवलंबून रहावे लागते.
त्यामुळे गृहनिर्माण संस्थांना त्यातून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क अधिनियम 1963 चा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यांतर्गत सक्षम अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधकांची नियुक्ती केली आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे प्लॉट होण्यासाठी शुक्रवारी अभिहस्तांतरण विशेष मोहिमेला सुरूवात झाली. सहकारी गृहनिर्माण संस्थांनी कार्यक्षेत्रातील तालुका उपनिबंधक, सहायक उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केले आहे.