प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिह्यात शनिवारी 16 जानेवारीला सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी 37580 व्हॅक्सीन बुधवारी कोल्हापुरात दाखल झाले. लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून महापालिका क्षेत्रात 6 आणि जिह्यातील 8 केंद्रांवर याचा प्रारंभ होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. मोहिमेचे नियोजन व पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी कोव्हिड व्हॅक्सीन लसीकरण मोहीम जिल्हा कृतीदल समितीची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, लसीकरण मोहिमेसाठी सामाजिक संस्था, वैद्यकीय संघटना, खासगी डॉक्टर्स या सर्वांचा सहभाग घ्यावा. त्यासंदर्भात बैठक आयोजित करावी. धर्मगुरूंनाही निमंत्रित करावे. सर्व लोकप्रतिनिधींना जवळच्या केंद्रांवर शुभारंभ प्रसंगी निमंत्रित करण्यात यावे. पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांच्या समन्वयातून लसीकरण मोहीम यशस्वी करावी.
जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. फारूख देसाई यांनी संगणकीय सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक आदी उपस्थित होते.