सुवासिनींनी केली घरातून अंबाबाईची सहस्त्रनामावली
प्रतिनिधी / कोल्हापूर
नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेचे औचित्य साधून शुक्रवारी मनोरमानगर (देवकर पाणंद परिसर) येथून ऑनलाईन कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दुपारी 4 ते सांयकाळी 6 यावेळेत हा सोहळा झाला. कोरोना संसर्गाची जाणिव ठेवत सुवासिनींना एका विशिष्ठ जागी एकत्र न आणता आपापल्या घरातच अंबाबाईच्या सहस्त्रनामावलीने कुंपुंमार्चन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सुवासिनींनी आपल्या घरातून अंबाबाईच्या सहस्त्रनामावलीने कुंपुंमार्चनाचा विधी केला. विधीसाठी अंबाबाईच्या पादुका, कुंकु, तिळगुळ व फुटाणे आदी विधीचे साहित्य मोफत दिले होते. शिवसेना उपशहर प्रमुख सुधीर राणे यांनी ऑनलाईन कुंकूमार्चन सोहळ्याचे आयोजन केले होते.
घरी सुबत्ता यावी, सर्वांना चांगले आरोग्य लाभावे, सुखा-समाधानाचा संसार व्हावा हा उद्देश घेऊन कुंकूमार्चन सोहळा आयोजित केला जात असतो. सुवासिनीही मोठ्या श्रद्धेने सोहळ्यात सहभागी होत असतात. आजच्या सोहळ्यात देवकर पाणंद, संभाजीनगर, राजलक्ष्मीनगर, पांडवनगरी, निकम पार्क, भवानी हौसिंग सोसायटी, शिवाजीनगर, श्रीकृष्ण कॉलनी, शाम सोसायटी, स्वप्नगंधा कॉलनी, मनोरमानगर, सुबल रेसिडेन्सी, विजयनगर, नाळे कॉलनी, जुहीनगर येथील सुवासिनी सहभागी झाल्या होत्या. त्यांना कुंकुमार्चन सोहळ्याची लिंक पाठविण्यात आली होती. करवीर क्षेत्रउपाध्याय सुहाज जोशी यांनी सुवासिनांकडून सहस्त्रनामावलीने कुंकुमार्चन करवून घेतले.