प्रतिनिधी / कोल्हापूर
सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवरून महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे आणि महापालिका कर्मचारी संघ यांच्यात मंगळवारी झालेली चर्चा फिस्कटली. बैठकीत सहमती न झाल्याने गुरूवार 31 डिसेंबरपर्यत कर्मचारी संघाने अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, सकारात्मक निर्णय झाला नाही तर गुरूवारी रात्री बारा वाजल्यापासून महापालिकाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशारा महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांनी दिला आहे.
महापालिका कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे. सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर महापालिका कर्मचारी संघाने केली आहे. मात्र राज्य शासनाच्या अटी, शर्तीमुळे महापालिका सातवा वेतन आयोग लागू करण्यास असमर्थ आहे, असे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गेल्या आठवडÎात स्पष्ट केले होते. तसेच कर्मचारी संघाबरोबर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, मंगळवारी प्रशासक डॉ. बलकवडे आणि कर्मचारी संघाचे पदाधिकारी यांच्यात ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात बैठक झाली. अध्यक्ष संजय भोसले यांनी सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सविस्तर विवेचन केले. शासनाच्या अटी, शर्ती असल्या तरी राज्यातील सोलापूर आणि पनवेल वगळता इतर महापालिकांनी अंमलबजावणी सुरू केली आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेनेही नोव्हेंबरचा पगार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे डिसेंबरमध्ये दिला असल्याची बाब भोसले यांनी निदर्शनास आणून दिली. आयोगाची अंमलबजावणी करताना घरफाळा व इतर वसुलीसंदर्भातही अटी आहेत. महापालिकेच्या विविध विभागातील महसूल वसूल करण्यासाठी सर्व कर्मचारी, अधिकारी आठ तासांपेक्षा जादा काम करण्यास तयार आहेत. महापालिका प्रशासनाने जबाबदारी द्यावी, असेही भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.
वसुलीचा आढावा घेऊन निर्णय ः प्रशासक डॉ. बलकवडे
कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱयांचे म्हणणे ऐकून घेल्यानंतर प्रशासक डॉ. बलकवडे यांनी राज्य शासनाच्या निर्देशानुसार असणाऱया अटी, शर्ती पाहून निर्णय घ्यावा लागणार असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेच्या महसूल वसुलीची सध्याची स्थिती कशी आहे? याचा आढावा घेतला जाईल. त्यासाठी प्रत्येक विभागातील प्रमुखांना माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. महसूल वसुलीसंदर्भात आढावा घेतल्यानंतर कर्मचारी संघाला कळविले जाईल, असे प्रशासक डॉ. बलकवडे यांनी सांगितले.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त विनायक औधकर, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड यांच्यासह कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, जनरल सेपेटरी अजित तिवले, खाजानिस सिकंदर सोनुले, सचिव अनिल साळोखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
वसुलीचे कारण देऊन महापालिका प्रशासन सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करणे टाळत आहे. महसूल वसुलीसाठी अधिकारी, कर्मचारी जादा काम करण्यास तयार आहे. गुरूवारपर्यंत प्रशासनाने सकारात्मक निर्णय दिला नाही तर त्याच दिवशी रात्रीपासून महापालिका कर्मचारी बेमुदत संपावर जातील.
-संजय भोसले, अध्यक्ष महापालिका कर्मचारी संघ
सातवा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या काही अटी, शर्ती आहेत. त्याचबरोबर वसुलीसंदर्भातही नियम आहेत. त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो. सद्यःस्थितीत विविध विभागांच्या महसूल वसुलीचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. त्याआधारे मिळणाऱया माहितीधारे निर्णय कळविला जाईल.
-डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक, कोल्हापूर महापालिका