नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि प्रलंबित कामांवरून महापालिका प्रशासकांची नाराजी
प्रतिनिधी / कोल्हापूर
नागरिकांची प्रलंबित कामे आणि वाढत असलेल्या तक्रारीमुळे नाराज झालेल्या महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी घरफाळा, टीपीच्या अधिकाऱयांसह इतर विभागातील अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. मंगळवारी महापालिकेत डॉ. बलकवडे यांनी आढावा बैठक घेतली. त्यामध्ये नागरिकांच्या वाढलेल्या तक्रारी आणि थकलेली कामे त्याचबरोबर अधिकाऱयांच्या कामाच्या पद्धतीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
घरफाळा विभागाच्या कामाकाजाविषयी होत असलेल्या तक्रारी, त्याचबरोबर घरफाळा वसुलीच्या गतीवरून प्रशासक डॉ. बलकवडे यांनी सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांच्याकडे विचारणा केली. चार महिन्यात किती घरफाळा वसुली झाली. सद्यःस्थिती कशी आहे?, या प्रश्नावर डॉ. बलकवडे यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे समजते. नगररचना विभाग अर्थात टीपीच्या कामावरही या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. बांधकाम परवानगीच्या फाईल पडून आहेत. त्यांना मंजुरी, परवानगी वेळेत दिली जात नाही.
गतीने काम केले जात नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्याची निर्गंत करा, अशा शब्दात नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक आर. एस. महाराज, उपशहर नगररचनाकार रमेश मस्कर यांना डॉ. बलकवडे यांनी सूचना दिल्या. उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण यांना शहरातील बेकायदेशीर होर्डिंग्ज, बॅनर, फलक यांच्यावर कोणती कारवाई केली?, किती गुन्हे नेंद केले? अशा प्रश्नांची सरबत्ती या बैठकीत करण्यात आली. त्यावर चव्हाण यांनी होर्डिंग्ज जप्तची कारवाई केल्याचे सांगत वेळ मारून नेली.
नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घ्या
आगामी लोकशाही दिनात नागरिकांच्या ज्या तक्रारी येतील त्याची गंभीर दखल घ्या, तक्रारीचे निरसन करा, प्रलंबित कामे पूर्ण करा, अशा सूचनाही प्रशासक डॉ. बलकवडे यांनी या बैठकीत केल्याचे समजते.