81 प्रभागांसाठी 21 डिसेंबरला आरक्षण सोडत
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या सोमवार 21 डिसेंबरला महापालिकेच्या 81 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाटÎगृहात प्रभाग आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती उपआयुक्त निखील मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिलीं. सकाळी अकरा वाजता सुरू होणाऱ्या या सोडतीच्या प्रक्रियेचे स्थानिक वृत्त वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपणही करण्यात येणार असल्याचे उपआयुक्त मोरे यांनी सांगितले.
दरम्यान, कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडणार? या बद्दल सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार त्यांच्या समर्थकांत उत्सुकता निर्माण झाली असून सर्वांचे लक्ष सोमवारवरच्या सोडतीवर लागले आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या 2015 ते 2020 या काळातील सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर रोजी संपली होती. त्यानंतर कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती. आता पुढील वर्षी होणाऱया निवडणुकीची प्रक्रिया प्रभाग आरक्षण सोडतीने सुरू होणार आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात प्रारुप प्रभाग रचना आराखडा महापालिकेच्या प्रशासन डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या परवानगीने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्याला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिल्यानंतर आता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
21 तारखेला प्रभाग आरक्षण सोडत
सोमवार 21 डिसेंबर रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले नाटÎगृहात सकाळी 11 वाजता 81 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या प्रक्रियेची माहिती उपआयुक्त निखिल मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विजय वणकुद्रे आणि मोहन सूर्यवंशी उपस्थित होते.
उपआयुक्त मोरे म्हणाले, प्रभाग आरक्षण सोडत काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. संपूर्ण पारदर्शीपणे सोडत काढण्यात येईल. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. 21 डिसेंबरला आरक्षण सोडत झाल्यानंतर त्याच दिवशी प्रभागाचा आराखडा प्रसिद्ध करण्यात येईल. 23 डिसेंबर ते 4 जानेवारी 2021 या काळात नागरिकांच्या हरकती, सूचना घेण्यात येणार आहेत. 6 जानेवारीला हरकती, सूचना, महापालिकेचा अभिप्राय राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर आयोगाकडून येणाऱया निर्देशानुसार पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
आरक्षण सोडतीचे थेट प्रक्षेपण आणि रेकॉर्डिंग
आरक्षण सोडतीचे थेट प्रक्षेपण स्थानिक वाहिन्यांबरोबर युट्युबसारख्या सोशल मीडियावरूनही करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शीपणे व्हावी, यासाठी संपूर्ण रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाटÎगृहात सोडत प्रक्रियेवेळी पत्रकार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, महापालिकेचे आजी-माजी पदाधिकारी यांच्यासह नागरिकांना प्रवेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाटÎगृहाच्या एकूण आसन क्षमतेच्या पन्नास टक्केच व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. प्रथम येणाऱया नागरिकांना प्राधान्य राहिल. त्याचबरोबर खासबाग मैदानातही एलसीडीवर थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा केली असून तेथेही नागरिकांना सोडत प्रक्रिया पाहता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोडतस्थळी गर्दी टाळून घरीच थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून प्रक्रिया पाहावी, असे आवाहनही उपआयुक्त निखिल मोरे यांनी केले.
अशी होणार सोडत प्रक्रिया
1 ते 81 प्रभागांचे वाचन केले जाईल. त्यानंतर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 11 प्रभागांचे आरक्षण काढले जाईल. त्यामध्ये 5 प्रभाग अनुसूचित प्रवर्गासाठी तर 6 प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्ग महिलांसाठी असतील. नागरिकाचा मागास प्रवर्गच्या 22 प्रभागांसाठी आरक्षण काढण्यात येईल. त्यामध्ये 11 प्रभाग नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तर 11 प्रभाग नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलांठी असतील. उर्वरीत 48 प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी (खुला वर्ग) आरक्षण काढण्यात येईल. त्यामध्ये 24 सर्वसाधारण प्रवर्गातील तर 24 सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी असतील.
आरक्षण सोडत काढताना गेल्या तीन निवडणुकांचा विचार
आरक्षण सोडत काढताना 2005, 2010 आणि 2015 या काळात झालेल्या निवडणुकीत प्रभाग खुले होते. असे प्रभाग आरक्षण सोडतीसाठी निवडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ज्या अकरा प्रभागावर गेली अनेक वर्षे अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण आहे. त्या प्रभागांचे आरक्षण बदलणार आहे. त्या प्रभागांच्या जागी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाच्या निकषाधारे इतर प्रभागांवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण पडू शकते.
असे असेल प्रभाग आरक्षण
आरक्षण प्रवर्ग प्रभाग संख्या
अनुसूचित जाती 5
अनुसूचित जाती महिला 6
नागरिकांचा मागासवर्ग 11
नागरिकांचा मागासवर्ग महिला 11
सर्वसाधारण 24
सर्वसाधारण महिला 24
एकूण प्रभाग 81