प्रतिनिधी/पेठ वडगाव
हातकणंगले- वडगाव रस्त्यावर मिणचे येथे सोमवारी, (दि.13) दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली होती. या अपघात एक जण गंभीर जखमी झाला होता. या गंभीर जखमी युवकाचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कृष्णात आनंदा शिंगे (रा.पेठ वडगाव, ता.हातकणंगले) असे या मृत युवकाचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, पेठ वडगाव येथील नाभिक व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष कृष्णात शिंगे हे हातकणंगले येथून आपल्या मुलाचे शाळेतील साहित्य घेवून दुचाकीवरून पेठ वडगावच्या दिशेने येत होते. दरम्यान मिणचे येथे वडगावहून येणार्या मोटारसायकलने शिंगे यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत कृष्णात यांच्या डोक्याला, छातीला व पायाला गंभीर दुखापत झाली. तर मुलगा मोटारसायकलवरून उडून बाजूला पडून किरकोळ जखमी झाला. धडक दिलेला बुवाचे वाठार (ता.हातकणंगले) येथील मोटारसायकलस्वार किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारास वडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गंभीर जखमी कृष्णात यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले होते. मात्र, आज, मंगळवारी त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सामाजिक कामात अग्रेसर व मनमिळावू स्वभावाच्या असलेल्या कृष्णात याच्या मृत्यू झाल्याची माहिती वडगाव शहरात समजताच शहरातील नागरिकातून हळहळ व्यक्त होत आहे.