प्रतिनिधी/पेठ वडगाव
पेठ वडगाव येथील वडगाव शेती उत्त्पन्न बाजार समितीने भरविलेल्या जनावरांच्या बाजारास या परिसरात राहणार्या नागरिकांनी विरोध करून आम्हाला कोरोनाचा संसर्ग झाल्यास बाजार समिती खर्च घालणार असेल तर हा बाजार सुरु करा अशी भूमिका घेवून जनावरांचा बाजार बंद करण्याची मागणी बाजार समितीकडे केली. कोरोनाच्या संसर्ग वाढण्याच्या शक्यतेने मार्च महिन्यापासून बंद असलेला हा जनावरांचा बाजार बाजार समितीने पणन मंडळाच्या आदेशामुळे सुरु केला होता. वडगाव पालिकेने या जनावरांच्या बाजाराला परवानगी देवू नये अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वडगाव शहर व शहरातील व्यावसाईक, नागरिक यांचा विरोध असताना हा बाजार सुरु करण्यात आल्याने नागरीकातून संताप व्यक्त झाला.
पेठ वडगाव बाजार समितीने पणन मंडळाने शेतकर्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जनावरांचा बाजार सुरु करण्याबाबत आदेश दिला होता. या बाबत पालिकेनेही परवानगी दिली होती. मात्र विविध भागातून व जिल्ह्यातून येणार्या नागरिकाकडून या ठिकाणी सोशलडिस्टन्सिंग पाळण्यात येणार नाही. या परिसरात विविध कॉलनी असून नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने हा बाजार बंद ठेवावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुख्याधिकार्याकडे करण्यात आली होती. मात्र हा जनावरांचा बाजार आज भरला. काही काळ हा बाजार सुरु राहिला मात्र या परिसरातील नागरिकांनी बाजार समितीमध्ये धाव घेवून हा बाजार सुरु करू नका. बाजारात एखादा कोरोना संसर्ग झालेला व्यक्ती आल्यास परिसरात संसर्ग पसरल्यास याला जबाबदार कोण अशी भूमिका घेवून हा बाजार बंद करण्याची मागणी केली. हा जनावरांचा बाजार भरविल्यास यामुळे कोरोना संसर्ग झाल्यास बाजार समितीने याचा खर्च देणार असेल तरच हा जनावरांचा बाजार सुरु करा अशी मागणी यावेळी उपस्थित संतप्त युवकांनी बाजार समिती सचिव व पदाधिकारी यांचेकडे केली.
हा जनावरांचा बाजार बंद ठेवावा या मागणीसाठी इंदिरा कॉलनी, सहारा चौक, यादव कॉलनी येथील नागरिक बैठक घेणार असून पुढील जनावरांचा बाजार भरवू नये या बाबत बाजार समितीस देण्यात येणार असल्याचे येथील युवकांनी सांगितले.
आज जनावरांच्या बाजारात जनावरे कमी प्रमाणात आली असली तरी भरलेल्या या बाजारात सोशलडिस्टन्स पाळण्यात आल्याचे दिसून आले नाही तर अनेकजण विना मास्क बाजारात फिरत होते. बाजार समितीकडून सोशलडिस्टन्स पाळण्याच्या सूचना करण्यात येत होत्या. सूचना देणारा फलकही बाजारसमितीने लावला होता परंतु व्यापारी समिती कर्मचार्यांचे व्यापारी ऐकत नव्हते. असे चित्र बाजारात दिसत होते. पालिका कर्मचारी या ठिकाणी पूर्ण वेळ थांबणे गरजेचे होते मात्र या ठिकाणी कर्मचारीही दिसत नव्हते.